महासत्तेची बंदूकसंस्कृती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार झाला. या घटनेने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. हल्लेखोर एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून, त्याने राजकीय द्वेषातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, यामागे इतर शक्यताही वर्तवल्या जात आहेत. अमेरिकेतील बंदूक संस्कृती आणि द्वेषपूर्ण वक्तव्ये या घटनांना कारणीभूत ठरत आहेत.

महासत्तेची बंदूकसंस्कृती

शिंग्टनमधील एका कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना धक्कादायक आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षावर हल्ला करण्याचा प्रयत्न तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. सर्वाधिक कडेकोट मानली जाणारी बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था भेदण्याच्या या प्रकारामुळे तेथील यंत्रणांमधील कच्चे दुवेही ठळकपणे समोर आले आहेत. या हल्ल्यातून ट्रम्प आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बचावल्या आणि हल्लेखोरासही रक्षकांनी तातडीने अटक केली. मात्र, निवडक व्यक्तींनाच प्रवेश असलेल्या अशा कार्यक्रमस्थळी बंदूक आणि सुऱ्यासारखी शस्त्रे घेऊन एखादा अनाहूत प्रवेश करून इतक्या जवळ पोहोचू शकतो आणि त्याची कोणतीही पूर्वसूचना यंत्रणांना मिळत नाही, हे यातून दिसले. इराणशी युद्ध अद्याप पूर्णपणे समाप्त झालेले नसताना हा प्रकार घडल्यामुळे साऱ्या जगभरात यामागील हेतूवर चर्चा होणे साहजिक आहे. हल्लेखोराने राजकीय द्वेषातून हा प्रयत्न केल्याचे आणि अद्याप तरी यामागे संघटित कट नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे; मात्र या घटनेशी संबंधित सर्व शक्याशक्यतांचा कसून तपास झाला, तरी सर्वच तपशील उघड होईलच, असे नाही!

जगातील सर्वांत परिपक्व लोकशाही असलेला देश, हा अमेरिकी नागरिकांच्या अभिमानाचा मुद्दा आहे. साहजिकच अशा देशांत व्यक्तिस्वातंत्र्य आणि मतभेदांना मुक्त स्थान अपेक्षित आहे. मात्र, इतिहास तपासला तर आजवर राजकीय हिंसाचाराच्या अनेक गंभीर घटना या देशातच घडल्याचे दिसते. चार अध्यक्षांना हिंसक घटनांमध्ये प्राणास मुकावे लागले, तर रोनाल्ड रेगन यांच्यासारख्या काही जणांवर प्राणघातक हल्ले झाले; विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची ही तिसरी घटना. यापूर्वी ते एकदा अशाच गोळीबारात जखमी झाले होते. या आत्ताच्या घटनेत कॅलिफोर्नियातील कोल टॉमस ॲलन या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर पूर्वीपासूनच तेथे खोली घेऊन राहिला आणि त्याने आधीच शस्त्रेही हॉटेलात आणली, असे आता तपासात उघड होत आहे. ॲलन हा पूर्वीपासून ट्रम्प यांच्याविरोधात रागाने धुमसत होता, असे त्यानेच कुटुंबीयांना पाठवलेल्या संदेशांतून समोर येत आहे आणि हल्ल्याचा कटही त्याने एकट्यानेच रचल्याचे यंत्रणांनी म्हटले आहे. मात्र, या घटनेबाबत अन्यही शक्यता व्यक्त होत आहेत. त्यामध्ये इराणशी युद्धकाळात अमेरिकेत उफाळून आलेला ट्रम्पविरोधी राग आणि इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या, अशी पार्श्वभूमी पाहता या हल्ल्यामागे इराणकडेही अंगुलिनिर्देश होणे साहजिक होते. त्याबरोबरच ‘ट्रम्प यांनी स्वत:च हा हल्ला घडवून आणला असावा,’ असेही तर्क काही गोटांमधून लढवण्यात येत आहेत. मात्र, हल्लेेखोर राजकीय द्वेषाने पछाडला असावा, हा तर्क त्यातल्या त्यात वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षांवरील हल्ल्याचा प्रकार चिंताजनक असला, तरी जगभरातच सामाजिक-राजकीय जीवनात झालेली पराकोटीचा द्वेष-तिरस्काराची लागण आणि त्यातून अपरिहार्यपणे जन्म घेणारा हिंसाचार, हेच त्याचे मूळ आहे. खुद्द ट्रम्प यांची द्वेषमूलक आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये त्याची साक्ष असून, यापूर्वी ‘कॅपिटॉल हिल’ वर झालेला हल्लाही त्याचीच परिणती होती. हल्ली राजकीय नेते भाषणांमध्ये सर्रास भडकावणारी वक्तव्ये करतात आणि त्यातून होणाऱ्या ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा घेतात, हा अनेक देशांमधला नित्याचा अनुभव आहे; मात्र एखादा ॲलनसारखा माथेफिरू चुकीच्या प्रेरणा घेतो आणि त्याचे भयंकर परिणाम होतात, हे दुर्दैव आहे. अमेरिकेतील ‘ बंदूक संस्कृती ’चाही या घटनांमध्ये मोठा वाटा असून, खुद्द ट्रम्प यांचाही या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास हातभार लागला आहे. बाजारातून भाजी खरेदी करावी, तशा पद्धतीने अमेरिकेत सर्वसामान्य नागरिकांना बंदुका उपलब्ध होतात. आजमितीला शंभर नागरिकांमागे १२० बंदुका या सरासरीने अमेरिकेत ४० कोटी बंदुका असाव्यात, असा अंदाज आहे. अशी घातक शस्त्रे बेजबाबदार-विखारी हातात पडण्याचे परिणाम जगातली प्रगत लोकशाही भोगत आहे; इतर देशांनीही यातून बोध घेतला पाहिजे. अमेरिकेच्या अध्यक्षांवरील हल्ल्याचा त्यांच्या विरोधकांसह जगभरातून निषेध करण्यात आला, ते योग्यच आहे. मात्र, नुकतीच इराणच्या सर्वोच्च नेत्यासह वरिष्ठ नेत्यांची हत्या झाली, त्यामागील गुन्हेगारांविरोधात तेवढ्या तीव्रतेने आवाज उठवला गेला नाही, हेच वास्तव राजकीय हिंसाचाराबाबतची जगाची सोयीस्कर भूमिका उघड करते.