रेथॉन शर्यतीचे वर्णनच इंग्रजीमध्ये ‘टू द लिमिट अँड बियाँड’ असे केले जाते. प्रत्येक मॅरेथॉन म्हणजे मानवी मर्यादा झुगारून काही तरी साध्य करून दाखविण्याचा प्रयत्न असतो. अगदी ज्या लढाईची वार्ता घेऊन फिडिपाईड्स धावत आला तेव्हाही त्याने, आपण विजयी झालो, असे सांगून प्राण सोडले. तेव्हापासून प्रत्येक मॅरेथॉन शर्यत हे धावपटूंपुढचे मोठे आव्हानच ठरत आले आहे. ही शर्यत किती वेळात पूर्ण केली जाते याच्या नोंदी ठेवायला लागल्यापासून तर हे आव्हान अधिक जीवघेणे होत गेले. रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकताना सॅबेस्टियन सेव या खेळाडून अधिकृतपणे दोन तासाच्या आत हे अंतर पूर्ण करताना जागतिक विक्रम नोंदविला, तेव्हा मानवी क्षमतांची नवी परिसीमा लिहिली गेली, असेच म्हटले पाहिजे. त्याने ही शर्यत एक तास ५९ मिनिटे आणि तीस सेकंदात पूर्ण केली. त्याच्या प्रयत्नांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या शर्यतीचा अर्धा भाग पूर्ण करण्यास लागलेल्या वेळापेक्षा उत्तरार्ध पूर्ण करण्यास त्याला लागलेला वेळ कमी होता. वास्तविक शास्त्रीय माहितीनुसार ठराविक अंतरानंतर तुमच्या शरीरातील शर्करा कमी होऊ लागते. अशा वेळेस तुम्हाला धावण्यासाठी अधिक ऊर्जा तुमच्या स्नायूंमधून घ्यावी लागते व ते अधिक अवघड असते. पण हा समजही खोटा ठरवत सॅबेस्टियन सेवने विजय मिळविला. या शर्यतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू योमिफ केजेल्याकाहानेही दोन तासांच्या आत शर्यत पूर्ण केली. मॅरेथॉन आणि दोन तासांचा टप्पा गेली अनेक वर्षे माणसाला खुणावत होता. याच अट्टहासातून विशेष वातावरणात आयोजित केलेल्या शर्यतीत एलिउद किचॉगे या केनियाच्या धावपटूने २०१९मध्ये ही शर्यत १ तास ५९.४० मिनिटांत पूर्ण केली होती; त्याच्या बरोबरचे सहधावक बदलत होते, तसेच त्याच्यासाठी या शर्यतीसाठी विशिष्ट प्रकारचे बूटही बनविले गेले होते. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची नोंद अधिकृतपणे झाली नाही. पण दोन तासांच्या आत ही शर्यत पूर्ण करता येते हा विश्वास त्याच्यामुळे निर्माण झाला. रविवारी त्या विश्वासाच्या जोरावरच ध्येय गाठले गेले आणि इतिहास घडला. शंभर मीटरची स्पर्धा दहा सेकंदाच्या आत पूर्ण करण्याचे आव्हान गेल्या शतकामध्ये मानवाने पेलले होते. आता मॅरेथॉनचा टप्पा पार केला गेला आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत त्यामध्ये अधिक सुधारणा होईल. तोपर्यंत तरी सॅबेस्टियन सेव याने रविवारी नोंदवलेली आजवरच्या क्षमतेच्या पलीकडची कामगिरी हाच आदर्श मानला जाईल.





