थोडं हसू या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लेखिका जयू देवधर यांनी हसण्याचे महत्त्व सांगितले आहे. बसमधील ड्रायव्हर, स्वच्छता मावशी, डॉक्टर यांच्या हसण्याने आनंद मिळतो. अनोळखी देशातही भारतीय व्यक्तीला पाहून हसू येते. पार्कमधील 'रन फॉर फिटनेस' कार्यक्रमातही हसून प्रोत्साहन दिले जाते. एका अनोळखी तरुणीशी झालेल्या संवादातूनही आनंद मिळतो. हसण्याने माणसे जोडली जातात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

थोडं हसू या...

नंद हा आपण अनुभवायचा असतो; मग तो गाण्यातील, पुस्तकातील किंवा नाटकातील असा कोणताही असो. या आनंदाची पहिली पावती म्हणजे मनापासून हास्याचा प्रतिसाद. या प्रतिसादाला शब्दांची जोड लागत नाही. फोटो काढताना आपण सहजच ‘स्माइल प्लीज’ म्हणतो. खरे तर आपण कोणीच हसत जन्माला येत नाही; पण ही हास्य निर्माण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, मग हीच हास्याची लकेर ‘हसले मनी चांदणे’ हा सहज, सरळ भाव निर्माण करतेच; पण अनेकांच्या मनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

बऱ्याच दिवसांनी बसने जात होते. प्रचंड गर्दी-रेटारेटीतून स्टॉपला उतरताना सहज ड्रायव्हरकाकांना ‘थँक यू’ असे हसत म्हटले. त्यांनीही अंगठा उंचावून प्रतिसाद दिला. क्षणभराचा हास्यसंवाद होता. सकाळी नेहमीच्या वेळेस येणाऱ्या स्वच्छता मावशी सहज हसत ‘हाय काकू’ म्हणाल्या; एकदम भारी वाटले. इतकेच कशाला, कितीही आजारपण असू देत; आमचे फॅमिली डॉक्टर ह. वि. सरदेसाई यांच्या ‘स्माइल’ने निम्मा आजार बरा व्हायचा. असे अनेक प्रसंग चेहऱ्यावर हसू व मनात समाधान आणतात. हास्यातून असा आनंद न होणारा माणूस विरळाच!

थोडं हसू या...

थोडं हसू या...

हा शब्द फक्त फोटोपुरताच मर्यादित नाही तर अनोळखी देशात आपले माणूस भेटण्याचा आनंद एका ‘स्माइल’ मधून व्यक्त होते. त्यासाठी नाव-गावांचीही गरज नसते. फक्त भारतीय आहे, इतकेच त्यासाठी पुरेसे!

रविवारमुळे निवांत वेळ होता. व्हॅन्कुव्हरला राधिकाच्या घरासमोरच छान, हिरवीगार प्रशस्त पार्क आहे. सकाळी हलक्याशा गारव्यात फिरण्याचा आनंद काही वेगळाच. सुट्टी असूनही पार्कमधे खूप वर्दळ होती. ‘रन फॉर फिटनेस’ असा कार्यक्रम सुरू होता. तरुण मंडळींबरोबर ज्येष्ठ नागरिकही होते. स्पर्धा सुरू झाल्याबरोबर उत्साहाच्या भरात आम्ही दोघे बाजूला उभे राहून टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होतो. प्रत्येक जण ‘थँक्स’ म्हणून दिलखुलास स्माइल देत होते. इतरही आमच्यात सामील झाले व मोठा ‘पॉझिटिव्ह ऑरा’ तयार झाला.

एकदा ‘स्काय ट्रेन’च्या गर्दीत एक भारतीय मुलगी दिसली. न सांगताच चेहेऱ्यावर दिलखुलास स्माइल आले आणि क्षणभराची जवळीकही आली. पुढच्या स्टेशनला मी उतरले, तर ती पटकन दारापाशी येऊन ‘बाय बाय’ करत होती. गोष्ट छोटीशी वाटते; पण आनंद देणारी व माणसे जोडणारी आहे. ‘मॉर्निंग वॉक’ ला किती जण ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात, स्मितहास्यासह. बरेच दिवसांनी एकटीच पार्कमधे फिरायला गेले. फिरून झाल्यावर सहज बाकावर टेकले. आजूबाजूला बघताना समोर एक ३०/३१ वर्षाची तरुण मुलगी व्हिडीओ कॉलवर छान गप्पा मारत होती. कॉल संपल्यावर अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण बोलणार कसे? मग थोड्या वेळाने स्वतःला सावरत सहज इकडे तिकडे बघत होती. मग मी एक ‘स्माइल’ दिले. ‘आंटी आप कहाँ से हो?’ तिने जवळ येत विचारले. मग मी माझी ओळख करून दिली. मूळची चंडीगडची रावी नोकरीनिमित्त येथे आली. उत्सुकतेपोटी विचारले, ‘घर की याद आयी?’ तर ‘नाही,’ म्हणाली. तिची बालमैत्रीण लष्करात असून तिची बदली लडाखला झाली आहे. परत कधी भेटू, याची रुखरुख होती. पण पटकन ‘मूव्ह ऑन’ स्पिरिटने उभी राहून ‘बाय’ करत एक छान स्माइल देत म्हणाली, ‘आँटी, टेक केअर. आपसे मिलके बहुत अच्छा लगा.’

ती असो, की अन्य कोणी; भेटलेली ही मंडळी परत भेटतील की नाही माहिती नाही; पण हे प्रसंग व त्यांचे स्मितहास्य कायम लक्षात राहील. मग मनात येते, की जर एका स्मितहास्यातून लोकांच्या हृदयाची कवाडे उघडतात. तर थोडं हसू या...

- जयू देवधर, पुणे