या फॅक्टरीमध्ये कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन केल्या जात होते. नेमणूक केलेल्या कुणाकडेही नियुक्ती आदेश नाही. कामाचे तास ठरवले नाहीत. अल्पवयीन बालकांना धोकादायक ठिकाणी लावून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्यात येत होता. बालकामगारांना धोकादायक उद्योगांमध्ये कामाला लावणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे बुटीबोरी औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून, इतर कारखान्यांमध्येही तपास मोहीम राबविण्यात येणार आहे. सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांना बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार असून पुढील आदेश बालकल्याण समिती देणार आहे.
बुटीबोरी एमआयडीसी परिसरात बालकामगारांना राबविण्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. नारायणा फॅक्टरीमध्ये अल्पवयीन मुलांना धोकादायक परिस्थितीत कामाला लावले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राकेश भलावी यांनी केल्यानंतर बाल संरक्षण पथकाने तत्काळ छापा टाकत चार मुली व पाच मुलांची सुटका केली.तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. फॅक्टरीत अल्पवयीन मुलांकडून मोठ्या मशिनींवर काम करून घेतले जात होते. तसेच केमिकलच्या धोकादायक वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुलांच्या राहण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट व अस्वच्छ अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय, इतर जिल्ह्यांतीलच नाहीतर राज्याबाहेरील मुलांना आणून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात असल्याची बाब समोर आली आहे. छाप्यादरम्यान काही मुले बेपत्ता झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणी फॅक्टरीचे संचालक व इतर संबंधित चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई बुटीबोरी पोलिसांच्या सहकार्याने पार पडली. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, तक्रारदार राकेश भलावी, तसेच चाइल्डलाइन प्रतिनिधी पूजा कांबळे, मेघा पाटील आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या रूपाली वानखेडे अश्विनी चौरे पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून करण्यात आली.





