नागपूर : राऊळगावच्या एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी आरोपी असलेल्या तिघांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकेपासून दिलासा दिला आहे. रवींद्र पोखर्ण, सत्यवती पराशर आणि मनोज कुमार प्रसाद अशी या आरोपींची नावे असून त्यांचे अटकपूर्व जामीन मान्य करण्यात आले आहेत. मात्र, यातील पाच जणांचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. १ मार्च रोजी कंपनीच्या परिसरात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला. पोलिसांनुसार, कंपनीकडून सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन करण्यात आले होते. जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या अहवालात जोखीम मूल्यांकनाचा अभाव, अग्निशमन यंत्रणांची कमतरता, पुरेशा सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती न होणे आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न देणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. आरोपींकडून ॲड. अमोल मार्डीकर व ॲड. आदित्य चौधरी यांनी बाजू मांडली.





