याचदरम्यान सोनेगाव पोलिस ठाण्यातील अन्य श्वान जॅकी व लालूही पोलिस ठाण्यात आले. त्यांना बघताच हरवलेला व परत आणलेला श्वान शांत झाला. सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास श्वानमालक प्रशांत पांडे यांना मोबाइलवर प्रमोद मोहिते यांचे मिस्ड कॉल दिसले. त्यांनी मोहिते यांच्याशी संपर्क साधला. श्वान मिळाल्याचे त्यांनी प्रशांत यांना सांगितले. प्रशांत यांनी सोनेगाव पोलिस ठाणे गाठून श्वानाला ताब्यात घेत पोलिसांचे आभार मानले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, जबाबदारीने वागावे, असे आवाहन सोनेगाव पोलिसांनी केले. श्वानप्रेमाबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी मोहिते यांचे कौतुक केले.
पोलिसांचे नाव ऐकताच गुन्हेगारांची भंबेरी उडते. पोलिसांपासून बचावासाठी गुन्हेगार रात्ररात्र जागून काढतात. मात्र, इथे भलतेच घडले. येथे गुन्हेगार नव्हे, तर हरविलेला श्वान होता. या श्वानाने पोलिसांना रात्रभर जागविले, शहर फिरविले. अखेर, तब्बल पाच तासांच्या नाट्याचा सुखद अंत झाला.
प्रशांत पांडे (रा. पांडे लेआउट) यांचा श्वान गुरुवारी घरून बेपत्ता झाला. त्यांनी शोध घेतला असता तो आढळून आला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला शेवटचे बघण्यात आल्याचे परिचितांनी प्रशांत यांना सांगितले. रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास प्रशांत हे तक्रार देण्यासाठी सोनेगाव पोलिस ठाण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते रात्रपाळीला कर्तव्य बजावत होते. प्रशांत यांनी पाळीव श्वान बेपत्ता असल्याचे मोहिते यांना सांगितले. मोहिते यांनी प्रशांत यांना श्वानाचे छायाचित्र मागितले. हे छायाचित्र त्यांनी ठाण्यात कार्यरत पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केले. छायाचित्र बघताच गस्तीवर असलेल्या पोलिसांनीही श्वानाचा शोध सुरू केला. हेडकॉन्स्टेबल देवीदास इंगळे व प्रभाकर यांना उज्ज्वलनगर पेट्रोल पंप परिसरात श्वान दिसला. देविदास यांनी मोहिते यांना याबाबत माहिती दिली. मोहिते तेथे गेले. श्वान मिळाल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी लगेच प्रशांत यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. परंतु, प्रशांत यांचा मोबाइल बंद होता. आता काय करावे, असा प्रश्न मोहिते यांना पडला. श्वान सुरक्षित राहावा, यासाठी मोहिते हे त्याला घेऊन हॉटेलमध्ये गेले. खोलीत ठेवले असता श्वान आक्रमक झाला. खोलीबाहेर येऊन तो थेट उडी मारून पोलिसांच्या वाहनात बसला. श्वान एकटा राहू शकत नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन सोनेगाव पोलिस ठाण्यात आले. य
ादरम्यान मोहिते हे सतत प्रशांत यांच्या मोबाइलवर संपर्क साधत होते. परंतु, मोबाइल बंदच होता. ठाण्यात आणल्यानंतर श्वान अधिक आक्रमक झाला, भुंकू लागला. मोहिते, उपनिरीक्षक दत्त कुंभारे, हेडकॉन्स्टेबल कालिदास यांनी श्वानाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला बिस्किट व पाणी दिले. त्यानंतर श्वान थोडा शांत झाला.





