बिशकेक (किर्गिझस्तान) : भारताच्या ललितने वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ५५ किलो ग्रिको-रोमन प्रकारात रौप्यपदक मिळवले, तर नीतेशने ९७ किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी झालेल्या या स्पर्धांमध्ये माजी विजेता सुनीलकुमारने ब्राँझपदकाची कमाई केली.
ललितने उपांत्य फेरीत चीनच्या हुओयिंग शी याचा पराभव केला होता. मात्र, अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या इख्तियोर बोतिरोव्हचे आव्हान परतवून लावणे त्याला शक्य झाले नाही. त्याला ०-९ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. ८७ किलो गटात ब्राँझपदकाच्या लढतीत सुनीलकुमारने उझबेकिस्तानच्या महंमद कोदिर रसुललोव्हचा ५-४ असा पराभव केला. तत्पूर्वी, २३ वर्षीय नीतेशने ९७ किलो ग्रिको-रोमन गटात अंतिम फेरी गाठून २०२५ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे.

