‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

महाराष्ट्र टाइम्स

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता १ मे ते ८ मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही. पात्र विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा देत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली आहे. पूर्वी ३० एप्रिल ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती, मात्र पालकांचा प्रतिसाद आणि सोयीचा विचार करून आता १ मे ते ८ मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे.

या कालावधीत सोडत यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणतीही अतिरिक्त संधी दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्जाची माहिती तसेच शाळांची यादी अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. पालकांनी नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘वंचित राहू नये’

'आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेश ही वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. कोणताही पात्र विद्यार्थी केवळ कागदपत्र पडताळणीअभावी वंचित राहू नये, यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे,’ असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.