मराठी गीतसृष्टीतील अजरामर गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी अलिबागमध्ये ३ मे रोजी स्व. जगदीश खेबुडकर फाउंडेशनच्या वतीने 'गीत जगदीश' या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साडेआठ वाजता 'पीएनपी' नाट्यगृहात ही मैफल रंगणार आहे.
या कार्यक्रमात खेबुडकर यांच्या गाजलेल्या गीतांचा आस्वाद घेता येणार असून, मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा वेधही घेतला जाणार आहे. 'जगदीश खेबुडकर ते द जगदीश खेबुडकर' असा त्यांचा प्रवास, गीतनिर्मितीमागील आठवणी आणि काही अनोळखी किस्से रसिकांसमोर उलगडले जाणार आहेत. त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरलेल्या 'पिंजरा' चित्रपटातील गाण्यांवर सुमारे ४५ मिनिटांचा भाग ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी खास कोल्हापूरहून गायक व वाद्यवृंद येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर आसनव्यवस्था असणार आहे. त्यामुळे संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. जगदीश खेबुडकर फाउंडेशनचे मुकुल खेबुडकर यांनी केले आहे.







