अंबरनाथ पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शहरातील पुनर्वसन धोरण, पावसाळ्यापूर्वीची आरोग्य तयारी आणि कचराभूमीवरील आगीसारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा शिवसेना नगरसेवकांनी संख्याबळाच्या जोरावर तहकूब केल्याचा आरोप भाजपने केला. तर सभागृहातील माइक बंद ठेवत आवाज दाबण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या संघर्षात नागरी समस्या मात्र वेठीस धरल्या जात आहेत.
गेल्या तीन महिन्यांत पहिली सर्वसाधारण सभा असो वा स्वीकृत नगरसेवक निवडण्याच्या वेळी दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत सभागृहातील गोंधळ होऊन नागरी समस्या वेठीस धरल्या जात आहेत. मंगळवारी शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरण आणि पावसाळ्यापूर्वीच्या आरोग्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा होती. मात्र शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या पत्रवाचनाच्या आग्रहाला नगराध्यक्षांनी नकार दिला.
शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्षांचा विरोध डावलत पत्र वाचन केले. त्यानंतर सभा सुरळीत चालणे अपेक्षित असताना शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडत बहुमताच्या जोरावर सभा स्थगित केली. त्यामुळे विविध महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा रखडल्या. यामुळे पावसाळ्यात शहरातील आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो, असे सांगत याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी केला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या विरोधात पालिकेच्या प्रवेशद्वारावर बॅनर हाती घेत आंदोलन केले.
सभागृहात माइक जाणीवपूर्वक बंद ठेवत शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते रविंद्र करंजुले यांनी केला. तर पुनर्वसन धोरणाबाबत आम्ही आवाज उठवून विषय मंजूर केला आहे, त्यामुळे या सभेत काहीही चुकीचे घडलेले नसल्याचे करंजुले यांनी सांगितले. नगराध्यक्ष निवडणुकीतील पराभव शिवसेना पचवू शकलेली नाही. त्यामुळे शहर विकासावर चर्चा न करता विकासाला विरोध करण्याची भूमिका शिवसेना घेत असल्याचा आरोप अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुले यांनी केला आहे.






