स्थानक छपराविना

महाराष्ट्र टाइम्स

बदलापूर शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. रेल्वे स्थानकावर शेड नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर विशेष गैरसोय आहे. कर्जत-खोपोली मार्गावरील गाड्यांची वाट पाहताना प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. अनेक कामे रखडल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे. लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानक छपराविना
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने चाळिशीचा टप्पा ओलांडल्याने उष्णतेचा तीव्र फटका नागरिकांना बसत आहे. शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडत असताना बदलापूर रेल्वे स्थानकावर मात्र शेडअभावी हजारो रेल्वे प्रवाशांना दिवसभर उन्हाचा चटका सहन करतच गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे स्थानकाच्या कायापालट आणि विकासाच्या गप्पा हाकणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

बदलापूर रेल्वे स्थानकातून हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करत असतात. स्थानकांवर मूलभूत सुविधा वाढवणे आणि स्थानकाचा कायापालट करण्याच्या नावाखाली गेल्या चार वर्षांपासून रेल्वे स्थानकाचा संथ गतीने विकास सुरू आहे. त्यामुळे याविरोधात वारंवार रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येऊन आंदोलनेही करण्यात आली आहेत. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना विशेषतः प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शेड नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या दिवसभर थांबत असून दररोज सुमारे ३५ गाड्यांची ये-जा येथे होते. हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. मात्र गाड्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास अंतर असल्याने प्रवाशांना शेडअभावी भर उन्हात उभे राहून लोकलची प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, अनेकजण उन्हापासून बचावासाठी पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर किंवा सावलीच्या जागी आसरा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानकावरील सुधारणा कामांअंतर्गत होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र अद्यापही अनेक कामे रखडलेली आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शेड उभारणी न झाल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.