कोडीनयुक्त सिरपच्या ५०० बाटल्या जप्त

महाराष्ट्र टाइम्स

मुंब्रा पोलिसांनी कारवाई करत कोडीनयुक्त सिरपच्या ५०७ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी हमजा अन्सारी आणि फुर्कन शेख या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची दुचाकी देखील जप्त केली आहे. आरोपींनी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत विक्रीसाठी या बाटल्या मागवल्याचे सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

mumbra police seize 500 bottles of codeine syrup arrest two youths

कोडीनयुक्त सिरपच्या ५००हून अधिक औषधांच्या बाटल्यांचा साठा जप्त करीत मुंब्रा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. हमजा अन्सारी (२३), फुर्कन शेख (२४) अशी या अटक आरोपींची नावे आहेत.

मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार आणि इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी सोमवारी रात्री मुंब्रा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी ऐरोली-मुंब्रा बोगद्याजवळ दुचाकीवर दोघेजण संशयितरित्या आढळले. यावेळी त्यांच्याकडे दोन बॉक्स होते. बॉक्स तपासल्यानंतर त्यामध्ये प्रतिबंधित कोडीनयुक्त सिरपच्या ५०७ औषधांच्या बाटल्या आढळून आल्या. १०० मिलीच्या एका बाटलीची किंमत १२ हजार रुपये असून एकूण साठ्याची किंमत सहा लाख आठ हजार चारशे रुपये आहे. पोलिसांनी आरोपींची दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हमजा आणि फुर्कन यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाटल्यांविषयी पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केल्यानंतर आरोपी ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील काही लोकांकडून विक्री करण्यासाठी या बाटल्या मागवित असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास एपीआय केदार करीत आहेत.