भांडेवाडीतील दुर्गंधीवर तत्काळ उपाययोजना करा

महाराष्ट्र टाइम्स

महापौरांनी भांडेवाडीतील दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. अंबाझरीसह शहरातील तलावांतील जलपर्णी काढण्यासाठी एक्वेटिक वीड हार्वेस्टर मशिन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे परिसरातील जलपर्णीचे निर्मूलन केले जाईल. कचरा प्रक्रिया प्लांटमधील चिमणीची उंची वाढवणे आणि सुरक्षा भिंतीवर टिन लावणे यावरही विचार सुरू आहे.

mayor takes direct action on odor in bhandevadi

अंबाझरीसह शहरातील इतर तलावांमध्ये वाढणाऱ्या जलपर्णीवर नियंत्रण आणण्यासाठी एक्वेटिक वीड हार्वेस्टर मशिन भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली. पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी या दोन मशिन घेतल्या जाणार आहेत. यामुळे परिसरातील जलपर्णी काढून टाकण्याचे काम या मशिनद्वारे केले जाणार आहे.

भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील दुर्गंधीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत महापौर नीता ठाकरे यांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी तत्काळ कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या दुर्गंधीमुळे प्रभाग २३, २४, २५ आणि २६मधील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर महापौरांच्यावतीने बैठक घेण्यात आली.

बैठकीत बोलताना नगरसेवक प्रदीप पोहोणे यांनी, डम्पिंग यार्डमुळे भांडेवाडीतील दुर्गंधीचा विषय गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी महापौर नीता ठाकरे व स्थायी समिती सभापती शिवानी वखरे दाणी यांनी भांडेवाडीचा दौरा केल्यानंतर दुर्गंधीचे प्रमाण बरेच कमी झाले. मात्र, अद्यापही थोडाही पाऊस आला तरी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते, असे सांगितले. नगरसेवक बाळू रारोकर यांनी, दुर्गंधीसाठी कचऱ्यावर करणाऱ्या प्रक्रिया प्लांटमध्ये चिमणीची उंची कमी असल्याचा मुद्या उपस्थित केला. भांडेवाडी डम्पिंग यार्डला लागून असलेल्या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. यासाठी सुरक्षा भिंतीवर टिनाचा पत्रा लावल्यास नागरिकांना त्रास होणार नाही, अशी सूचना रारोकर यांनी यावेळी केली.

नगरसेवक दीपक वाडीभस्मे यांनी, परिसरात दुर्गंधी हवेत पसरत असल्याने कुलरद्वारे घराघरात दुर्गंधी घुसत असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधले. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या झाकलेल्या राहत नसल्याने दुर्गंधी हवेत पसरते व कचरा रस्त्यावर पडत असल्याचेही अनेक नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.

बैठकीला नगरसेविका ऋतिका मसराम, नगरसेविका सरिता कावरे, नगरसेवक अरुण हारोडे, नगरसेविका शीतल रारोकर, नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक राजेश्वर दिवटे, नगरसेविका महेश्वरी बिसेन, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, सीमा ढोमणे, शारदा बारई यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अंकित, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

रसायनाच्या फवारणीची

मात्रा वाढवा

भांडेवाडी परिरसरातील नगरसेवकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी दुर्गंधी येणार नाही, यासंदर्भात तत्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच यासाठी रसायनाच्या फवारणी करण्याची मात्रा वाढवावी, असे निर्देश दिले. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुसबिडी प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. भांडेवाडी परिसरातील कचऱ्याचे ढीगही कमी झाले. भांडेवाडीमध्ये अनेक दिवसांपासून साचलेल्या जवळपास अडीच हजार टन कचऱ्यावर प्रतिदिन प्रक्रिया केली जात आहे. त्याचप्रमाणे सूर्यनगरनगरातील सुरक्षा भिंत लहान असल्याने तेथील नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी या भिंतीवर टिन लावण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांनी कडक निर्देश देऊन कचरा वाहून नेणारी वाहने उघडी जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. सध्या भांडेवाडी येथील एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पात प्रतिदिन ८०० टन नवीन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे सर्वाधिक प्रभावी होणाऱ्या भागातील कचरा उचलण्याला प्राधान्य द्यावे, असेही महापौरांनी सुचविले.