राजनाथ यांनी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका केली. ‘तृणमूल सरकारने जात व धर्माच्या आधारावर समाजाची विभागणी केली आहे. राजकारण हे न्याय, मानवता व समता यावर आधारलेले हवे. ममताजी, मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितो. तुम्ही राजकारण जरूर करा, परंतु ते समाजाच्या समाधानासाठी असावे, तुष्टीकरणासाठी नाही’, असे ते म्हणाले. ‘घुसखोरांना त्या आपली राजकीय ताकद मानत असल्याने त्या त्यांना रोखू इच्छित नाहीत’, असा आरोपही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केला.
कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
‘पाकिस्तानने चिथावणीखोर विधाने करणे थांबवावे; अन्यथा ५५ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, तशीच परिस्थिती पुन्हा ओढवेल. त्यांनी बंगालकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर यावेळेस पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे केवळ देवालाच ठाऊक’, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावले. ‘पाकिस्तानने भूतकाळातील परिणामातून धडा घ्यायला हवा. ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच विधान केले होते की, भारताने भविष्यात कोणतेही धाडस केल्यास इस्लामाबाद कोलकात्यावर हल्ला करून चोख प्रत्युत्तर देईल’, असेही ते म्हणाले.
अभिषेक बॅनर्जी यांचे प्रत्युत्तर
आसिफ यांच्या या विधानानंतर भारतीय राजकारणातही याचे पडसाद उमटले आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. ‘स्वतःला ५६ इंच छातीचे म्हणवणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारात इतके व्यग्र आहेत की त्यांना बंगालवरील बाह्य आक्रमणाच्या धमकीला उत्तर द्यायला वेळ नाही’, असे ते मोदी व शहा यांना उद्देशून म्हणाले. ‘ केंद्र सरकारने या सार्वभौमत्वावरील हल्ल्याचा निषेध करण्याचे धाडस दाखवले नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारतीय सैन्याला मोकळीक देऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) ताब्यात घेऊन दाखवा’, असे आव्हानही बॅनर्जी यांनी मोदी, शहा आणि राजनाथ सिंह यांना दिले आहे. या वादाने आता पश्चिम बंगालमधील रवातावरण तापले आहे.





