पाफोस (सायप्रस) : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला (प्राग) कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत नेदरलँड्सच्या अनिश गिरीकडून हार पत्करावा लागली. प्रज्ञानंदच्या खात्यात केवळ ३.५ गुण आहेत. त्यामुळे त्याच्या जागतिक विजेता डी. गुकेशचा आव्हानवीर होण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.
प्रज्ञानंद अनिश गिरीविरुद्ध काळ्या मोहरा असताना ४४ चालींत पराभूत झाला. प्रज्ञानंदचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. त्याने एकच विजय मिळवला आहे. प्रागने ‘व्हिएन्ना’ प्रकाराने सुरुवात केली. मात्र, भक्कम ओपनिंगसाठी प्रसिद्ध असलेला अनिशने पांढऱ्या मोहरा असल्याचा फायदा घेतला. त्याने प्रागला मोहऱ्यांची अदलाबदल करण्यास भाग पाडले. हत्ती आणि वजीराच्या साथीने वजीराच्या बाजूने आक्रमण करण्याचा प्रागचा प्रयत्न होता. मात्र, अनिशचे अश्व हे आक्रमण सहज रोखत होते. काही वेळातच खेळाची वेळेशी सांगड घालणेही प्रागला अवघड झाले. वैशालीने आठव्या फेरीत प्रयत्नांची शर्थ केली. मात्र तिला बिबिसारा असुबायेवाविरुद्ध ७४व्या चालीनंतर बरोबरी मान्य करावी लागली.

