मणिपूरमध्ये पुन्हा ठिणगी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. विष्णूपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री खेमचंद सिंह यांनी घटनेचा निषेध केला असून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा ठिणगी

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचे लोण पसरले आहेत. विष्णूपूर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री एका घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका पाच वर्षांचा मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर त्यांची आई जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी निदर्शने केली. तणाव वाढल्यामुळे चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि पाच जिल्ह्यांत इंटनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मोइरांग ट्राेंग्लाओबी भागातील एका घरावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकला. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी मंगळवारी सकाळी आंदोलने केली. परिसरातील पेट्रोल पंपाजवळील दोन ते तीन टँकर आणि ट्रकला आग लावण्यात आली. मोइरांग पोलिस ठाण्यासमोर टायर जाळण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली पोलिस चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. संतप्त नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पांगेई आणि खुराई येथे आणि इम्फाळ पश्चिममधील लंगथाबल येथे वाहनांची वाहतूक थांबवली. रस्त्यांमध्ये टायर जाळले.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला. ‘हे क्रूर कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलांच्या जखमी आईची खासगी रुग्णालयात भेट घेतली.

तीन दिवस इंटरनेट बंद

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मणिपूर मधील इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत ब्रॉडबँड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारने मंगळवारी प्रसृत केले.