नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. आपत्कालीन सेवांसह दैनंदिन रुग्णसेवेलाही याचा फटका बसत आहे. या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मेडिकलमध्ये स्वतंत्र पाइपलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने महापालिकेकडे केली आहे. मेडिकल हे विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीगडमधील रुग्णांसाठी रास्तदरात उपचार मिळणारे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचारासाठी येतात. याशिवाय, एमबीबीएस, पदव्युत्तर, नर्सिंग, बीपीएमटी, यूजी, पीजी, असे विविध अभ्यासक्रमाचे शेकडो विद्यार्थी येथील वसतिगृहांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे रुग्णालयातील लॉन्ड्री, स्वयंपाकगृह तसेच वसतिगृहातील कॅन्टीनसाठी येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, मनपाच्या ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि. कडून मेडिकलमधील पाणीपुरवठा अनेकदा अचानक खंडित केला जातो.






