इराणलाच लागेना सुरुंगांचा थांगपत्ता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने पेरलेले सुरुंग शोधणे कठीण झाले आहे. सदोष नकाशा आणि उपकरणांच्या अभावामुळे इराणला हे सुरुंग काढता येत नाहीत. यामुळे तेलमार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अमेरिका इराणवर सामुद्रधुनी खुली करण्याचा दबाव टाकत आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे इराणला हे शक्य होत नाहीये. यामुळे जहाज वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब लागत आहे.

irans footprint of mines in the hormuz strait

सागरी सुरुंग पेरण्यापेक्षा ते शोधून निष्क्रिय करण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ व किचकट असते. सामुद्रधुनीत सुरुंग पेरणाऱ्यांनी प्रत्येक सुरुंगाचे निश्चित स्थान नोंदवलेले नाही. शिवाय, काही उपकरणे पाण्यात टाकल्यानंतर प्रवाहामुळे वाहून गेल्याने हे सुरुंग शोधण्यात अडचण येत आहे. इराण कडे मोठ्या क्षेत्रातील सुरुंग वेगाने हटवण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जोपर्यंत सर्व सुरुंग हाती लागत नाहीत, तोपर्यंत इराण जगातील या सर्वांत व्यग्र तेलमार्गांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर शत्रूदेशांची कोंडी करण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. या जलमार्गावर कोणी आक्रमण करू नये, यासाठी इराणने त्यामध्ये सुरुंग पेरले. आता हेच सुरुंग सामुद्रधुनी खुली करण्यात मोठा अडथळा ठरत आहेत. पेरलेले सर्व सुरुंग शोधून निष्क्रिय करणे तांत्रिक कारणास्तव इराणला शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.

सदोष नकाशांकन (मॅपिंग) आणि प्रवाहामुळे वाहून गेलेल्या उपकरणांमुळे भूसुरुंगाचा शोध घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जहाजवाहतूक लवकर पूर्ववत होणे अशक्य असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे हा शांतता चर्चेतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय चर्चेत तो सध्या केंद्रस्थानी आहे. सामुद्रधुनी तातडीने खुली करून अधिकाधिक जहाजांना परवानगी देण्याची मागणी अमेरिकेने इराणला केली आहे; परंतु ‘तांत्रिक’ मर्यादांमुळे संपूर्ण जलमार्ग खुला करणे शक्य नसल्याचे इराणने कळवले आहे. सामुद्रधुनीत पेरलेले सुरुंग सापडत नसल्याने व या जलमार्गाच्या सुरक्षेची हमी देत येत नसल्यानेच इराणने ही सबब दिली असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

... म्हणून पेरले सुरुंग!

२८ फेब्रुवारीला हल्ले सुरू झाल्यानंतर इराणने लहान बोटींचा वापर करून होर्मुझच्या सामुग्रधुनीत सुरुंग पेरले. त्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने याबाबत धोक्याचा इशारा दिला. परिणामी, तेलवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाली आणि तेलाच्या किमती वाढल्या. पर्याय म्हणून इराणने एक अरुंद मार्ग खुला ठेवला असून, शुल्क भरणाऱ्या जहाजांना यातून जाण्याची परवानगी दिली जात आहे. काही स्थानिक निमसरकारी वृत्तसंस्थांनी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मार्गांचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. मात्र, या मार्गांना मर्यादा असल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.