आर्टेमिस १ ही मानवरहित आणि आर्टेमिस २ ही मानवी चांद्रमोहीम यशस्वी झाल्यामुळे पुढील मोहिमांसाठी नासाचा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे दरवर्षी एक आर्टेमिस मोहीम राबवली जाणार असल्याचे नासाने म्हटले आहे. आर्टेमिस ३ मोहिमेत डॉकिंगचा प्रयोग करण्यात येणार असून, आर्टेमिस ४ या मोहिमेतून २०२८ मध्ये अंतराळवीरांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्याची नासाची योजना आहे.
अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेतील अमेरिकी अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, ख्रिस्तिना कोच आणि कॅनडाचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे पाच वाजून ३७ मिनिटांनी पृथ्वीवर सुखरूप परतले. पाच दशकांनी पुन्हा चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात आलेल्या मानवी अवकाश मोहिमेची यशस्वी सांगता झाली.
फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून दोन एप्रिलला उड्डाण केल्यापासून पुन्हा पृथ्वीवर येईपर्यंत दहा दिवसांत अंतराळवीरांनी अवकाशात ११,१७,६५९ किलोमीटर प्रवास केला. चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूचे केलेले निरीक्षण, खग्रास सूर्यग्रहण आणि पृथ्वीपासून सर्वांत दूरचा मानवी प्रवास (४,०६,७७३ किमी) या कारणांसाठी ही मोहीम ओळखली जाईल. 'सर्व अंतराळवीरांना लवकरच व्हाइट हाऊसमध्ये प्रत्यक्ष भेटेन,' अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर दिली.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे (भारतीय प्रमाणवेळ) पाच वाजून तीन मिनिटांनी सर्व्हिस मॉड्यूलपासून ओरायन अवकाशकुपी विलग करण्यात आली. पाठोपाठ वातावरणात शिरण्यासाठी अवकाशकुपीची दिशा अनुकूल करण्यात आली. पाच वाजून २३ मिनिटांनी जमिनीपासून सुमारे १२२ किमी उंचीवर असताना अवकाशकुपीने वातावरणात प्रवेश केला. यावेळी तिचा वेग ताशी ४३ हजार किमीपेक्षा जास्त होता. वातावरणातील घर्षणामुळे अवकाशकुपीशी जमिनीवरील केंद्राचा संपर्क सुमारे सहा मिनिटे तुटला.







