अनेकांनी चारचाकी गाड्यांच्या रचनेत बदल करून फुटपाथवरच दुकाने थाटली आहेत. या गाड्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित आरटीओ कार्यालयात याबाबतचे पत्र पाठविले आहे, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणतीही गाडी खरेदी करताना नोंदणीच्या वेळी जशी गाडीची रचना असेल तशीच ती ठेवावी लागते. यात कुणी बदल करत असेल तर ते बेकायदेशीर ठरविण्यात येईल, आरटीओकडून वेळोवेळी अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी सांगितले.
‘मटा’च्या वृत्तामुळे महापालिकेने फुटपाथवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी धडाकेबाज कारवाई सुरू केली. आयटी पार्क परिसरातील अतिक्रमण काढण्यातही आले. मात्र, काहींनी परवाने असल्याचे सांगत मनपालाच दम भरला. अपुऱ्या पोलिस बंदोबस्तामुळे मनपानेही माघार घेत अशा ठेलेवाल्यांवर कारवाई तूर्तास स्थगित केली. या गुंडशाहीला मनपा घाबरली असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
दलाल फुटपाथची कशी विक्री करतात, हे वास्तव ‘मटा’ने ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून मांडले होते. त्यानंतर मनपाकडून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. महिन्याला सहा हजार रुपये भाडे घेऊन चक्क फुटपाथच विक्री करणाऱ्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी घरचा रस्ता दाखविला. आयटी पार्क परिसरातील नऊ दुकाने हटविण्यात आली. आयटी पार्कसह शहराच्या इतर भागांतही फुटपाथ मोकळे करण्यासाठी कारवाया करण्यात आल्या. शनिवारी मनपाच्या धरमपेठ झोनअंतर्गत दोन पथकांनी सीताबर्डी मुख्य रस्ता ते व्हरायटी चौक फुटपाथवरील अतिक्रमण काढले. या कारवाई यापुढेही सुरूच राहणार, असे मनपा आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार रविवारीही पथक शहराच्या वेगवेगळ्या भागात सक्रिय होते. मात्र, काही अतिक्रमणकर्त्यांनी मनपालाच आव्हान दिल्याने त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


