महालमध्ये मनपाची धडक; ६० फेरीवाल्यांना दणका

महाराष्ट्र टाइम्स

मनपाने महाल परिसरात धडक कारवाई केली. ६० फेरीवाल्यांवर कारवाई करत सहा ठेले जप्त केले. फुटपाथ मोकळे करण्यासाठी मनपाचे पथक सज्ज आहे. लक्ष्मीनगर, गांधीबाग, धरमपेठ झोनमध्येही अतिक्रमण काढण्यात आले. आयटी पार्क, बडकस चौक, महाल चौक, शनिवारबाजार, सीताबर्डी, इतवारी या भागांतही कारवाई झाली. मनपाची ही धडक मोहीम सुरूच राहणार आहे.

municipal corporations strident action 60 hawkers taken down

महापालिकेतर्फे रविवारी महाल परिसरातील ६० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सहा ठेले जप्त करण्यात आले असून विविध झोनमधील पथकांच्या माध्यमातून हा धडाका सुरूच राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ अवघ्या सहा हजारांत विकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘मटा’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघडकीस आल्यानंतर महापालिकेने याची गंभीर दखल घेत कारवाया सुरू केल्या. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पथकाने आयटी पार्कमधील फुटपाथ मोकळे केले. गांधीबाग झोनअंतर्गत झोन कार्यालय, बडकस चौक, महाल चौक, शनिवारबाजार या भागांतील अतिक्रमण हटविण्यात आले. रविवारीही मनपाचे पथक आयटी पार्कसह महाल, इतवारी, बडकस चौक, सीताबर्डी या परिसरात पोहोचले. रविवारी महाल परिसरातील ६० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सहा ठेले जप्त करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त संजय कांबळे यांनी सांगितले. उपायुक्त मंगेश खवले, उपअभियंता उदयसिंग खंडाते यांच्या मार्गदर्शनात या कारवाया करण्यात आल्या. चार झोनच्या माध्यमातून ७० जणांची चमू हे अतिक्रमण हटविण्यासाठी तैनात आहे. मनपाच्या चमूने इतर भागांतही कारवाया केल्या. धरमपेठ झोनअंतर्गत तीन पथकांनी सीताबर्डी मुख्य रस्ता ते व्हरायटी चौक परिसरात रविवारी दिवसभर अतिक्रमण काढले. अवैध ठेले आणि दुकाने हटविण्यात आली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आयटी पार्क ते व्हीएनआयटी आणि दक्षिण अंबाझरी मार्ग ते जयताळा या भागातील ठेले हटविण्यात आले. गांधीबाग झोनअंतर्गत बडकस चौक ते महाल परिसरात कारवाई करण्यात आली. पाच अतिक्रमण निर्मूलन पथकांच्या माध्यमातून या कारवाया करण्यात आल्या. नंगा पुतळा परिसर आणि इतवारी येथे रस्ता मोकळा करण्यात आला असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.