मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प उभा राहत आहे.
आशिया खंडात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेमुळे नावारूपास येणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी क्रीडा आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व यंत्रणेला केल्या. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नुकतीच प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या क्रीडा संकुलात ‘ब्लॉक ए’मध्ये मल्टी स्पोर्ट्स अरेना साकारत असून तळमजला अधिक तीन असे एकूण चार मजली इमारत असेल. यात तळमजल्यावर वाहनतळ, ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव , डायव्हिंग पूल असेल.पहिल्या मजल्यावर क्रीडा विज्ञान केंद्र, टेबल टेनिस, प्रेक्षक गॅलरी, ग्रंथालय व मल्टीस्पोर्ट्स हॉल राहील. दुसऱ्या मजल्यावर दहा मीटर शूटिंग रेंज, फिटनेस सेंटर, कुस्ती आणि ज्युडो कोर्ट, बॉक्सिंग रिंग, मल्टीपर्पज हॉल, जिम्नॅस्टिक, स्क्वॉश, फेन्सिंग अरेना राहील. ‘बी ब्लॉक’मध्ये आठमजली इमारत साकारणार आहे. यात तळमजल्याचा समावेश आहे. यात बँक्वेट हॉल, किचन हे तळमजल्यावर असेल. पहिल्या मजल्यावर बोर्ड गेम्स, ग्रंथालय, ई-गेमिंग झोन, टीव्ही रूम राहील. दुसऱ्या मजल्यावर मल्टीपर्पज हॉल, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, योगारूम राहील. तिसऱ्या मजल्यावर स्पा, जिम्नॅशियम, चौथ्या मजल्यावर रूफटॉप जलतरण तलाव, रूफटॉप रेस्टॉरंट, इनडोअर रेस्टॉरंट राहील. पाचव्या व सहाव्या मजल्यावर सर्व्हिस अपार्टमेंट राहील. सातव्या मजल्यावर प्रेसिडेन्शियल सूट्स, डिलक्स सूट राहतील. याचबरोबर येथे अन्य १० ब्लॉक साकारणार आहेत.


