अभियंते, फायरमनला महिनाअखेर नियुक्तीपत्रे

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक महापालिकेतील अभियंता आणि अग्निशमन विभागातील पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ११४ अभियंते आणि १८६ फायरमन, वाहनचालकांची निवड यादी जाहीर झाली आहे. १५ व १६ एप्रिल रोजी कागदपत्र पडताळणी होईल. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील. यामुळे महापालिकेला नवीन मनुष्यबळ मिळणार आहे.

nashik municipal corporation completes recruitment process for 300 posts appointment letters to be issued for engineers and firemen

नाशिक महापालिकेने ११४ अभियंते व अग्निशमन विभागासाठी १८६ फायरमन, वाहनचालकांसाठी ‘टीसीएस’मार्फत राबविलेली नोकरभरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. लेखी परीक्षेनंतर ११४ अभियंत्यांची निवडयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, फायरमन, वाहनचालकांची निवड यादीही जाहीर झाली आहे. येत्या १५ व १६ एप्रिल रोजी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, एप्रिलअखेर नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत.

नाशिक महापालिकेतील अभियंता संवर्गातील ११४, तर अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांसाठी ‘टीसीएस’मार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिकेत तब्बल २४ वर्षांनंतर भरती प्रक्रिया होत आहे. ३०० पदांच्या या भरतीसाठी १९ हजार ४९८ जणांचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते. या भरतीसाठी दि. २४ व २५ फेब्रुवारी रोजी नाशिकसह राज्यभरातील १३ शहरांमध्ये २९ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. आक्षेप पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११४ अभियंत्यांची निवडयादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. तर, १८६ फायरमन, वाहनचालकांची निवडयादीही जाहीर झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे

पदभरतीसाठी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर आता पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी १५ व १६ एप्रिलची मुदत दिली जाणार आहे. छाननीअंती अंतिमरित्या पात्र उमेदवारांना महिनाअखेर नियुक्तीपत्रे प्रदान केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.