मिहानमध्ये गुंतवणुकीचा धडाका

महाराष्ट्र टाइम्स

नागपूरच्या मिहान प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे. लिथियम-आयन बॅटरी, विमानांचे सुटे भाग आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत. मिहान आता एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. स्थानिक कुशल कामगारांना त्यांच्या शहरात उत्तम संधी उपलब्ध होतील.

new era of investment in vidarbha due to mihan project

विदर्भाच्या आर्थिक विकासाचे इंजिन समजल्या जाणाऱ्या नागपूरमधील मिहान प्रकल्पाला नवी गती प्राप्त झाली आहे. विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी येथे मोठ्या भूखंडावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून, यामुळे आगामी काळात हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान, विमानांचे सुटे भाग आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांनी आपली पावले उचलत मिहानमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमध्ये व्ही फाइव्ह आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची गुंतवणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. सेक्टर ११मधील तब्बल १३ एकर जागेवर ही कंपनी लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानावर काम करणार आहे. सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) युगात या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, यातून तांत्रिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. भाग्यश्री होम अप्लायन्सेस ही कंपनी विमानांच्या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये उतरत असल्याने मिहानमधील एरोस्पेस हबला बळकटी मिळणार आहे. तसेच अनित्रा टेक्नॉलॉजी आणि आयडियल मॉकअप्स या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे उत्पादन आणि आयटी क्षेत्रात रोजगाराचे नवे मार्ग खुले होणार आहेत. मिहानमध्ये ज्या वेगाने गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे, ते पाहता नागपूर हे केवळ लॉजिस्टिक हबच नाही, तर एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहत आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक कुशल कामगार आणि इंजिनीअर्सना आपल्याच शहरात उत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.