जागतिक संरक्षण क्षेत्रात भारत आता केवळ उत्पादनच नाही, तर प्रगत तंत्रज्ञान निर्मितीतही आघाडी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर, डिफेन्स तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य स्टार्टअप टीसेकंड एआय मध्ये सोलार इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष नुवाल यांच्या एमएसएन होल्डिंग्स कंपनीने १९० कोटी रुपयांची (सुमारे २१.५ दशलक्ष डॉलर्स) गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक संरक्षण दलांच्या माहिती संकलन आणि निर्णय क्षमतेत क्रांतिकारक बदल घडवून आणणारी ठरणार असल्याचे मानलेजात आहे.
पारंपरिक माहिती तंत्रज्ञान प्रणाली या इंटरनेट किंवा क्लाउड कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतात, ज्या युद्धभूमीसारख्या दुर्गम किंवा शत्रूने जाम केलेल्या भागात निकामी ठरू शकतात. यावर उपाय म्हणून टीसेकंड एआयने ब्रिक हे फ्लॅगशिप प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यामुळे इंटरनेट नसतानाही हे तंत्रज्ञान युद्धभूमीवर माहितीचे विश्लेषण करण्यास सक्षम असणार आहे. हे प्लॅटफॉर्म पेटॅबाइट स्तरावरील डेटा साठवून त्यावर प्रक्रिया करू शकते. यामुळे युद्धभूमीवरील सेन्सर्स आणि स्वायत्त प्रणालींकडून मिळणाऱ्या माहितीवर रिअल-टाइम प्रक्रिया करून लष्करी कमांडर्सना त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
टीसेकंड एआयचे तंत्रज्ञान सध्या केवळ भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील मोठ्या संरक्षण कार्यक्रमांमध्ये वापरले जात आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे एकूण मूल्यांकन सुमारे २,६०० ते ३ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. टीसेकंड एआय कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल चावला असून ते येथील बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांचे जावई आहेत.


