मनपाचा परिवहन डेपो तसेच सात बस डेपोंसह मोरभवन-१, मोरभवन-२ येथील मालमत्तांची सुरक्षितता लक्षात घेऊन ८७ खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. हे सुरक्षारक्षक तिन्ही पाळ्यांमध्ये संबंधित स्थळी उपलब्ध राहणार आहेत.
‘आपली बस’मधील चेसीस आणि साहित्य गहाळ केल्याच्या प्रकरणात बससेवेचे संचालन करणाऱ्या तीन बस ऑपरेटरच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणात ३२ लाख ३९ हजार ७१० रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मिशन (जेएनयूआरएम) अंतर्गत महापालिकेला २३७ बसेस मिळाल्या होत्या. त्यांचे संचलन करण्यासाठी मनपाने मे. हंसा सिटी बस सर्व्हिसेस, मे. आर. के. सिटी बस सर्व्हिसेस व मे. ट्रॅव्हल टाइम सिटीबस सर्व्हिसेस या तीन ऑपरेटर्सची नियुक्ती केली होती. यात हंसा सिटी बस सर्व्हिसेसकडे ७९, आर. के. सिटीकडे ७९ तर ट्रॅव्हल टाइम सिटीकडे ७९ बसेस संचालन करण्याची जबाबदारी होती. यापैकी मे. हंसा सिटी बसकडे ४९ मे. आर. के. सिटी बसकडे १५ व मे. ट्रॅव्हल टाइम सिटी बसकडे ५९ अशी एकूण १२३ बसेसची १५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे निर्लेखन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात बसेस चेसीस व बसमधील काही साहित्य गहाळ असल्याचे निर्दशनास आले. यासंदर्भात कंपन्यांनी खुलासा करावा, अशी नोटीस परिवहन समितीने बजावली. परंतु, या तिन्ही ऑपरेटर्सनी नोटीसला उत्तर दिले नाही. या कंपन्यांनी कोणताही खुलासा न केल्याने या तिन्ही ऑपरेटरच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया समितीने सुरू केली आहे.


