जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा असे तीन धरण समूह आहेत. गंगापूर धरण समूहामधील काश्यपी धरणातील पाणीसाठा ८४.१८ टक्क्यांवरून ५०.९२ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तो ३१ टक्क्यांनी घटला आहे. पुणेगाव धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांनी, नागासाक्यातील साठा ३० टक्क्यांनी, वाकी, तीसगाव, ओझरखेड, वाघाड या धरणांमधील पाणीसाठा २६ टक्क्यांनी घटला आहे.
उन्हाची वाढत चाललेली तीव्रता, त्यामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे धरणांमधील पाणीसाठा दिवसागणिक कमी होतो आहे. महिनाभरात जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ८ हजार ३२१ दशलक्ष घनफुटांनी अर्थात १२ टक्क्यांनी घटला आहे. दररोज सरासरी २७८ दशलक्ष घनफुटांने पाणीसाठा कमी होतो आहे. माणिकपुंज धरण कोरडे पडले असून, सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे.
जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. शनिवारी (दि. ११) कमाल तापमानात एकाएकी ६.३ अंश सेल्सियसची वाढ होऊन ते ३८.८ अंश सेल्सियसवर पोहोचले. शहरासह ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी टँकरच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. पाण्याची सोडलेली आवर्तने, वाढलेली मागणी, उन्हामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यात एकूण २६ धरणे असून त्यांची पाणीसाठवण क्षमता सत्तर हजार सहाशे एकोणीस दशलक्ष घनफूट आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच १३ मार्चला एकूण पाणीसाठा ४० हजार ८८४ दशलक्ष घनफूट अर्थात ५७.८९ टक्के होता. सध्या तो ३२ हजार ५६३ दशलक्ष घनफूट अर्थात ४६.११ टक्के आहे. दररोज सरासरी २७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा कमी होत आहे.


