हापूस, पायरीचा बाजारात गोडवा

महाराष्ट्र टाइम्स

अक्षय्य तृतीया जवळ येत असल्याने बाजारात हापूससह विविध आंब्यांची आवक वाढली आहे. कर्नाटक, कोकण आणि दक्षिण भारतातून आंबे येत आहेत. आवक वाढल्याने हापूसच्या दरात घट झाली आहे. केशर, बदाम, लालबाग या आंब्यांचे दरही कमी झाले आहेत. यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला सर्वसामान्यांनाही आमरसाची चव घेता येणार आहे. भाज्याही स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

sweetness in the mango market high arrival on akshay tritiya

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर फळ बाजारात हापूससह इतर आंब्यांची आवक वाढली आहे. हापूससह लालबाग, बदाम, पायरी, तोतापुरी आदी प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. वाढत्या आवकेमुळे दरातही घट झाली आहे.

येत्या रविवारी (दि. १९) अक्षय्य तृतीया असून, आठवड्यावर आलेल्या सणाच्या पार्श्वभूमीवर फळबाजारात हापूससह विविध प्रकारचा आंबा दाखल होत आहे. फेब्रुवारीपासूनच वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा आंबा बाजारात लवकर दाखल झाला आहे. मागील आठवड्यापासून मात्र आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कर्नाटक, कोकण तसेच दक्षिण भारतातून विविध प्रकारचे आंबे बाजारात येत आहेत.

यामध्ये दशहरी, लंगडा, पायरी, बदामी, लालबाग, तोतापुरी या आंब्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. आवक वाढल्याने हापूसच्या दरात डझनामागे सुमारे दोनशे ते चारशे रुपयांची घट झाली आहे.

सध्या चांगल्या प्रतीचा हापूस ८०० ते १२०० हजार रुपये प्रतिडझन दराने विक्री होत आहे. याशिवाय केशर, बदाम, लालबाग यांसारख्या आंब्यांच्या दरातही प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांपर्यंत घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरातील घसरण आणि विविध प्रकारांची उपलब्धता यामुळे यंदा अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, यंदाच्या अक्षय तृतीयेनिमित्त सर्वसामान्यांनाही आमरसाची गोडी मनसोक्त अनुभवता येणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कृषीउत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. किरकोळ भाजी बाजारात गवार वगळता इतर सर्वच भाज्या ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. तर, गवार अद्यापही शंभर रुपये किलो दराने विक्री होत आहे.