‘अमेरिकेने अंतिम आणि उत्तम प्रस्ताव’ देऊनही इराणने तो नाकारला’, असे सांगत अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी इराण अणुकार्यक्रम बंद करण्यास तयार नसल्याचे सूचित केले. मात्र, ‘आमचा विश्वास कमवायचा की गमवायचा, याचा निर्णय अमेरिकेने घ्यायला हवा’, असे सांगत इराणचे मोहम्मद बाघेर यांनी कठोर पवित्रा घेतला. ‘अमेरिकेने ‘अवाजवी’ आणि ‘बेकायदा मागण्या’ केल्या, असा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण यांच्यात शनिवारी रात्रीपासून २१ तास चर्चा झाली. अमेरिकी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी अमेरिकेचे, तर इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर घलिबाफ यांनी इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. ‘इराणशी सुमारे २१ तास चर्चा केली. इराणशी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली, ही चांगली बातमी आहे. मात्र, आमच्यात कराराबाबत मतैक्य झाले नाही, ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी वाईट बातमी आहे’, असे व्हान्स यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखणे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे व्हान्स यांनी स्पष्ट केले. आम्ही इथे उत्तम आणि वाजवी प्रस्ताव समोर ठेवला. तो अंतिम आहे. इराण तो स्वीकारतात का, ते पाहायचे आहे, असे व्हान्स म्हणाले.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्दयावर चर्चेत अडथळे आल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ‘या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, इराण अमेरिकेचा विश्वास कमावू शकला नाही. इराणचा अणुकार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे हे या चर्चेत कळीचे मुद्दे ठरले, असे मानले जाते. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने जागतिक ऊर्जा क्षेत्रात स्थिरता निर्माण करण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा तातडीने खुली होण्याची आशा धुसर झाली आहे. त्यातच ट्रम्प यांनीच आता होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याने ऊर्जासंकट गहिरे होण्याचे संकेत आहेत.
चर्चेसाठी इराणचे शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री, तर अमेरिकेचे शिष्टमंडळ शनिवारी सकाळी इस्लाबादमध्ये दाखल झाले होते.


