‘होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्याची सुरुवात अमेरिकी नौदल तातडीने करेल’, असे अमेरिेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जाहीर केले. अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेली ऐतिहासिक २१ तासांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे युद्धविराम धोक्यात आला असून, पुन्हा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिका-इराण यांच्यात सुमारे साडेचार दशकांनी प्रथमच झालेली थेट चर्चा फिस्कटली. त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा कठोर पवित्रा घेत होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी करण्याचा निर्णय जाहीर केला. ‘होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यासाठी इराणला टोल देणारे प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाज रोखण्याची सूचना अमेरिकी नौदलाला केली आहे. कोणतेही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून येणार नाही आणि जाणारही नाही, हे सुनिश्चित करण्यास नौदलाला सांगण्यात आले आहे. बेकायदा टोल देणाऱ्या कोणत्याही जहाजाला सुरक्षित जलमार्ग देणार नाही’, असे ट्रम्प म्हणाले.
‘होर्मुझ’बंदीच्या निर्णयाद्वारे सुमारे २० टक्के जागतिक तेलवाहतुकीच्या या मार्गावर नियंत्रण मिळवतानाच एका महत्त्वाच्या उत्पन्नस्त्रोतापासून इराणला वंचित ठेवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. इराणला योग्य वेळी संपवण्यास अमेरिका तयार आहे, असेही ट्रम्प म्हणाले. अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा फिस्कटण्यासाठी इराणची आण्विक महत्वाकांक्षाच जबाबदार आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे पश्चिम आशियाच्या आखातात युद्धविराम धोक्यात आल्याचे मानले जाते.


