फसवणुकीचा संशय आला, पण उशीर झाला

महाराष्ट्र टाइम्स

ठाण्यातील एका वृद्ध महिलेची शेअर मार्केटच्या नावाखाली ९४ लाखांची फसवणूक झाली. समाजमाध्यमावरील जाहिरातीला भुलून महिलेने पैसे गुंतवले. आरोपींनी ॲप डाउनलोड करायला लावून पैसे भरून घेतले. नफ्याच्या आमिषाने आणखी पैसे मागितले. सीएकडे गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

94 lakhs fraud of an elderly woman cybercriminals game

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली सायबरचोरांनी ठाण्यातील एका वृद्ध महिलेची ९४ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे. वृद्धेला फसवणुकीचा संशय आला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित वृद्ध महिला घोडबंदर रोड परिसरात राहते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याविषयी समाजमाध्यमांवर जाहिरात दिसल्यानंतर तिने त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर तिला एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले गेले. या ग्रुपची ॲडमिन महिला शेअरविषयी सल्ला देत होती. या वृद्धेने शेअर, आयपीओ घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर गौरव नामक व्यक्तीला संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार वृद्धेने त्याला संपर्क केला. नंतर त्याने वृद्धेला ॲप डाऊनलोड करण्यास सांगून व्यवहारासाठी आवश्यक माहिती भरून घेतली. यानंतर सहा वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे, असे सूचवले. वृद्धेने २ लाख ८० हजार रुपयांचे शेअर तसेच लाखो रुपये मोजून आयपीओ खरेदी केले. ही रक्कम आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर भरली होती. अशा प्रकारे ३० जानेवारी ते १८ मार्च दरम्यान ९४ लाख ६१ हजार रुपये भरले.

संबंधित ॲपमध्ये नफ्यासह ही रक्कम १ कोटी ३८ लाख रुपये इतकी दाखवत होती. त्यामुळे वृद्धेने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नफ्याची रक्कम हवी असल्यास आणखी पैशांची द्यावेत, अशी मागणी केली. तसेच २२ लाख रुपये भरल्यास तुमचे सर्व पैसे मिळतील, असा ई-मेल पाठवला. त्यानंतर या वृद्धेला संशय आला. ती सीएकडे गेली असता आपली फसवणूक झाल्याचे समजले.