उलगडणार ‘सालबर्डी’चं सत्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

'सालबर्डी' हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. यात अंधश्रद्धा, गावातील राजकारण आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे यांसारखे कलाकार यात आहेत. दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

उलगडणार ‘सालबर्डी’चं सत्य

‘सालबर्डी’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, अंधश्रद्धा , गावातील राजकारण आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत यांचा वेध घेणारा सस्पेन्स-थ्रिलर आहे. नेब्युला फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव आहेत. चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे यांच्यासह अनेक दमदार कलाकारांचा समावेश आहे.

थरारातून उलगडणारी सत्यता

साधारण २०२२ च्या आसपास नगर भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या अनेक घटना ऐकायला मिळत होत्या. या सगळ्या अनुभवांना एकत्र करून आम्ही ‘सालबर्डी’ची कथा तयार केली. ही केवळ सस्पेन्स-थ्रिलर नाही, तर समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. पीआय मनोरमा या पात्राच्या माध्यमातून आम्ही अंधश्रद्धेच्या जाळ्याचा कसा भेद करता येतो हे दाखवले आहे.

- रमेश चौधरी, दिग्दर्शक

प्रत्येक पात्रात दडलेलं रहस्य

ही कथा वरवरची नाहीच. प्रत्येक पात्राला अनेक पैलू आहेत, काही दिसतात, काही लपलेले असतात. या चित्रपटाची खासियत म्हणजे ‘ग्रे शेड्स’. इथे कोणी पूर्णपणे चांगलं नाही आणि कोणी पूर्णपणे वाईटही नाही. संशयाची सुई सतत प्रत्येकावर फिरत राहते आणि प्रेक्षकही त्या खेळात गुंतून जातात. गावातली माणसं जशी वास्तवात असतात, तशीच इथेही दाखवली आहेत!

– शशांक शेंडेे

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचं उत्तर

‘सालबर्डी’मधली पीआय मनोरमा ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. कारण ही केवळ पोलिस ऑफिसरची भूमिका नाही, तर एक धाडसी आणि संवेदनशील स्त्रीची कहाणी आहे. या भूमिकेसाठी मी खूप तयारी केली, पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अभिनय म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. ही भूमिका माझ्या वाट्याला आली, तेव्हा एक समाधानाची भावना होती.. जणू काही मी ज्याची वाट पाहत होते.

– पूजा सावंत

समाजाला प्रश्न

विचारणारा सिनेमा

या चित्रपटात माझी भूमिका लहान असली तरी कथा ऐकून मी या सिनेमा साठी होकार दिला. अशा विषयांवर सिनेमा करणं खूप महत्त्वाचं आहे. ‘सालबर्डी’मध्ये अंधश्रद्धा, भीती आणि माणसांच्या मनातील संभ्रम यांचं वास्तव चित्रण आहे. आपल्याला काय बरोबर आणि काय चूक आहे, हे समजत असतं, पण तरीही आपण काही वेळा चुकीच्या गोष्टींना बळी पडतो... हाच मुद्दा या चित्रपटात अधोरेखित केला आहे.

– भारत गणेशपुरे

रहस्याचा खेळ

शेवटपर्यंत कायम

या चित्रपटात शेवटपर्यंत प्रेक्षकांना नक्की काय चाललंय हे पूर्णपणे समजत नाही. संशय सतत एका पात्रावरून दुसऱ्यावर जात राहतो. आम्हालाही शूटिंगदरम्यान शेवट पूर्णपणे सांगितला नव्हता, त्यामुळे अभिनय करतानाही एक वेगळी उत्सुकता होती. माझं पात्र वरवर साधं वाटतं, पण त्यातही अनेक पैलू आहेत.

– अंशुमन विचारे