भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असून, वाहतूक शाखेकडून मंगळवारी (१४ एप्रिल) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ‘जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवर चौक आणि विश्रांतवाडी चौक परिसरात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन वाहतूक उपायुक्त हिमंत जाधव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनांनी आरटीओ चौक व जहांगीर चौकमार्गे पुढे जावे; तसेच आरटीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूकही जहांगीर चौक मार्गे वळविण्यात येईल. जीपीओ चौकातून बोल्हाई किंवा मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक व नेहरू मेमोरियल चौक मार्गे वळविण्यात आली आहे. पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक अलंकार चौक मार्गे जाईल.
नरपतगिरी चौकाकडून येणाऱ्या वाहनांना १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक व कुंभारवेस चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक पॉवर हाउस चौक, नरपतगिरी चौक व १५ ऑगस्ट चौकमार्गे जाईल.
अरोरा टॉवर परिसरात बदल
डॉ. कोयाजी रस्त्याने नेहरू चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्याने नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून येणारी वाहतूकही एसबीआय हाउस चौक व तीन तोफा चौक मार्गे वळविण्यात येईल. नेहरू चौकातून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, ब्लू नाइल चौकमार्गे वळवली आहे.
इतर रस्त्यांवरील बदल
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), बाजीराव रस्ता परिसरातही गर्दीनुसार वाहतूक बदल केला जाणार आहे. बाजीराव रस्त्यावरील वाहतूक टिळक रस्ता व अलका टॉकीज चौक मार्गे वळविण्यात येईल. कमला नेहरू रुग्णालयाकडून येणारी वाहतूक लक्ष्मी रस्तामार्गे वळविण्यात येईल. सोन्या मारुती चौक व पवळे चौक परिसरातही पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे.
शहरातून बोपखेल, दिघी, भोसरी व आळंदीकडे जाणारी वाहतूक चंद्रमा चौक, होळकर पूल व खडकीमार्गे वळविण्यात येईल. पर्यायी मार्ग म्हणून चंद्रमा चौक, आळंदी रोड जंक्शन, आंबेडकर चौक, गोल्फ क्लब चौक व ५०९ चौक मार्गेही वाहतूक सोडण्यात येणार आहे. या भागात साप्रस चौक ते विश्रांतवाडी चौक मार्ग बंद राहणार आहे; तसेच विमानतळ रस्ता, पोस्ट ऑफिस चौकातून मेंटल कॉर्नरकडे जाणारी वाहतूक बंद असेल. आळंदी, दिघी व भोसरीकडून येणाऱ्या जड वाहनांना दिघी मॅगझीन चौकापुढे प्रवेशबंदी असेल. बोपखेल फाट्यापुढे विश्रांतवाडी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांनाही बंदी असेल. खडकी बाजारकडून टँक रस्त्याने विश्रांतवाडीकडे येणारी वाहने होळकर पूल व चंद्रमा चौकमार्गे वळविण्यात येतील; तसेच ५०९ चौकातून येणारी वाहने जेल रोड, गोल्फ चौक व आंबेडकर चौकमार्गे पुढे वळविण्यात येतील.



