ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील वाहतुकीत बदल

महाराष्ट्र टाइम्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे शहरात आज वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मिरवणुका आणि कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत अनेक मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. डोंबिवली, कल्याण, भिवंडी आणि बदलापूर येथेही वाहतुकीचे नियम बदलले आहेत. अवजड वाहनांनाही काही ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.

thane police traffic modifications for dr ambedkar jayanti

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज, ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात मिरवणुका व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी वाहतूककोंडी होऊ नये, याकरीता ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत बदल केले आहेत. मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

वाहतूक बदलाबाबत वाहतूक शाखेने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार ठाणे शहर, जीपीओ येथून कोर्ट नाका मार्गे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जीपीओ येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने सेंट्रल मैदान, मध्यवर्ती कारागृह मार्गे, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल, बाजारपेठ, ए वन फर्निचर मार्गे जातील. कळवा खाडी पूल येथून येणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेश बंद असेल. ही वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे, जीपीओ मार्गे मार्गक्रमण करतील.

सॅटीस पुलावरून टीएमटी आणि एसटी बसेसना टाॅवर नाका, टेंभीनाका मार्गे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या बसेस, गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास मार्गे जातील. रिक्षा आणि चारचाकी वाहनांना मुस चौकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही वाहने मुस चौकातून डावीकडे वळण घेऊन मार्गक्रमण करतील. कॅडबरी आणि नौपाड्याकडून डॉ. आंबेडकर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खोपट येथे प्रवेश बंद केला असून ही वाहने खोपटकडून डावीकडे वळण घेऊन कोलबाड, मीनाताई ठाकरे चौक मार्गे मार्गक्रमण करतील. डॉ. आंबेडकर रोडकडून खोपटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला असून ही वाहने उथळसर नाका मार्गे जातील.

डोंबिवलीत येथे प्रवेशबंदी

डोंबिवली पूर्व-पश्चिम भागात १० ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली. यात पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पाटणकर चौक चार रस्ता, पश्चिमेकडील कोपर ब्रिज, मोठा गाव रेतीबंदर चौक, म्हसोबा चौक तसेच ठाकुर्ली टी पॉईंट हनुमान मंदिर येथे वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

अवजड वाहनांना बंदी

कल्याण पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र चौक आणि मुंब्रा वाहतूक उपविभागातील कल्याण फाटा येथे वाहनांना प्रवेश बंदी आहे. ही वाहने मुंब्रा बायपास - खारेगाव - मुंबई-नाशिक महामार्गाने पुढे जातील. तर, शहाड जकात नाका मार्गे कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रेम ऑटो सर्कल चौक येथे प्रवेश बंद केला आहे. बदलापूर अंबरनाथ रोड नेवाळी नाका येथून तसेच नवी मुंबईकडून तळोजा बायपास मार्गे खोणी निसर्ग धाब्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. ही वाहने पर्यायी मार्गाने जातील.

भिवंडीतील धामणकर नाका येथून तसेच, रांजनोली चौकातून स्व. आनंद दिघे चौक आणि केशरबाग नाका येथे सर्व वाहनांना प्रवेश बंदी असून वाहने वंजारपट्टी मार्गे जातील.