येरवडा : उपनगरांत गेल्या काही दशकांमध्ये पुणे महापालिकेने साकारलेल्या उल्लेखनीय बागांमध्ये आवर्जून नाव घ्यावे असे एक ठिकाण म्हणजे स्व. भारत सावंत पाम उद्यान. आळंदी रस्त्यावर आठ एकर जागेत विस्तारलेल्या या उद्यानाने पुणे महापालिकेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट उद्यान स्पर्धेत सलग दोन वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. चार पॅगोडांव्यतिरिक्त या उद्यानात कोणतेही बांधकाम केलेले नाही. चोहोबाजूंनी वृक्ष, हिरवळ, आकर्षक पाण्याचे तळे, कृत्रिम धबधब्यामुळे ही बाग नेहमीच सगळ्यांचे आकर्षण ठरते. त्यामुळे रोज दीड ते दोन हजार नागरिक उद्यानात विरंगुळ्यासाठी, व्यायामासाठी हजेरी लावतात.
माजी महापौर स्व. भारत सावंत यांनी ही जागा त्यांच्या कार्यकाळात उद्यानासाठी आरक्षित करून घेतली होती. सावंत यांच्या सूनबाई शीतल सावंत नगरसेविका झाल्यानंतर उद्यानासाठी पाठपुरावा सुरू केला. आळंदी रस्त्यावर मेंटल कॉर्नर चौकात नदीकिनारी सुमारे आठ एकर जागेत हे उद्यान उभारण्यात आले आहे. उद्यानाची निर्मिती पुणे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेविका शीतल सावंत यांच्या संकल्पनेतून केली आहे. या उद्यानात २८ विविध जातींचे पाम वृक्ष लावण्यात आले आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अतिशय छोटे उद्यान असेल असे वाटते. सुरुवातीला दोन गझिबो असून, ते फुलांच्या वेलींनी बहरलेले आहे. सर्व बाजूंनी वृक्ष, हिरवळ, पाण्याचे तळे, नैसर्गिक असल्याचा भास निर्माण करणारा धबधबा, तळे व धबधब्याला जोडणारा १००० मीटरचा पूल, पाम वृक्षांमधून जाणारा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. उद्यान नदीकाठी असल्याने विविध प्रकारचे पक्षी येथे आढळतात. सकाळच्या प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात पक्षांच्या चिवचिवाट अनुभवता येतो.
उद्यानाची निर्मिती करताना या जागेमध्ये शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृक्ष जागेवर ठेवून हे उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानामध्ये विविध वयोगटांतील मुलांसाठी वयोमानानुसार खेळणी बसविण्यात आली आहे. यामध्ये झोके, घसरगुंडी, सी-सॉ, क्लायबिंग वॉल व इतर अनेक खेळणी आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक ओपन जीमची व्यवस्था करण्यात आली आहे.


