डोंबिवलीत अर्थसंवाद व्याख्यानमाला

महाराष्ट्र टाइम्स

डोंबिवलीत १५ ते १७ एप्रिल दरम्यान अर्थसंवाद व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यात प्राप्तिकर कायदा, बँकिंग, डिजिटल बँकिंग, सेवा उद्योग, व्यापार आणि जीएसटी या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील. सीए शंतनू बागवे, राजीव जोशी आणि सीए संजीव गोखले हे व्याख्याने देणार आहेत. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून अर्थसाक्षर होण्याचा संदेश दिला जाईल.

economic dialogue series in dombivli an opportunity to engage with financial experts

डोंबिवलीत अर्थसंवाद व्याख्यानमाला नवा प्राप्तिकर कायदा, नव्या व जुन्या करपर्यायांची निवड, बँकिंग, डिजिटल बँकिंगच्या सुविधा, त्यातून निर्माण होणारे धोके आणि सेवा व निर्मिती उद्योग, व्यापार, जीएसटी अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा उलगडा डोंबिवली येथे आयोजित अर्थसंवाद व्याख्यानमालेतून होणार आहे. १५ ते १७ एप्रिल सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ब्राह्मण सभा, पहिला मजला, लोकमान्य टिळक पथ, डोंबिवली पूर्व येथे ही व्याख्यानमाला होणार आहे. ब्राह्मण सभा डोंबिवली (शिक्षण समिती) यांच्यावतीने आयोजित या व्याख्यानमालेसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' माध्यम प्रायोजक असणार आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये अर्थविषयक संकल्पना समजावून देणाऱ्या मान्यवर लेखकांना भेटण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. बुधवार, १५ एप्रिल रोजी अर्थसंवाद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार असून यामध्ये 'सेवा व निर्मिती उद्योग, व्यापार आणि जीएसटी' या विषयावर सीए शंतनू बागवे व्याख्यान देणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी गुरुवार, १६ एप्रिल रोजी 'बँकिंग, डिजिटल बँकिंग - सुविधा व धोके' या विषयावर राजीव जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. तर शुक्रवार, १७ एप्रिल रोजी 'नवा प्राप्तिकर कायदा, करपर्यायाची निवड नवा की जुना' या विषयावर सीए संजीव गोखले यांचे व्याख्यान होणार आहे.

ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून या उपक्रमात ‘सहभागी व्हा आणि अर्थसाक्षर व्हा’, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती ब्राह्मण सभा डोंबिवलीचे विश्वस्त प्रा. डॉ. विनय भोळे यांनी दिली. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल दामले, कार्याध्यक्ष संजय कानिटकर आणि ब्राह्मण सभा (शिक्षण समिती) प्रमुख नीलेश वीरकर यांनी केले आहे.