९५ दिवसांत उभारली १४ मजली इमारत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पिंपरी येथे पीएमआरडीएने एक मोठा विक्रम केला आहे. चिखली येथे अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी राहिली. या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. यापूर्वीचा १०० दिवसांचा विक्रम मोडीत काढण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत बांधण्यात आली.

pmrda constructs 14 storey building a new world record

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( पीएमआरडीए ) गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा नवा झेंडा फडकावला आहे. चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी करण्याचा पराक्रम ‘पीएमआरडीए’ने केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेऊन ‘ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ’ आणि ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढून बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला. सोमवारी (१३ एप्रिल) चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित सोहळ्यात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी प्रमाणपत्र व पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला. मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला.

‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड गाठण्यात आला. ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या सुमारे नऊ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले. अत्याधुनिक ‘प्रीकास्ट आरसीसी’ तंत्रज्ञानामुळे इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू भूकंपप्रतिरोधक आहे.