नाशिक : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत मुलींवर अत्याचार, धर्मांतराची जबरदस्ती, गोमांस खायला लावणे, हिंदू देव-देवतांबद्दल अपशब्द बोलणे, ‘ब्लॅकमेलिंग’ सारखे प्रकार सुरू होते. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन कंपनीविरोधात नव्हे, तर त्या विध्वंसक अपप्रवृत्तिविरोधात होते, असा खुलासा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला.
केदार म्हणाले की, ‘एका मुलीने व तिच्या पालकांनी हिंमत दाखवून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनेक घटना उघडकीस येत आहेत. वास्तविक ज्यांनी हे गैरप्रकार केले, त्यांची इतकी दहशत होती की कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येत नव्हते. जेव्हा याचा अतिरेक होऊन हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन निघून गेलेले मुले-मुलीसुद्धा तक्रार देण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे घाबरून न जाता सर्व आयटी कंपन्यांसह औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी काम करावे. भाजप नेहमी त्यांच्या पाठीशी राहील. कोणी धमक्या, खंडणी, गैरप्रकार करीत असेल, भाजप कार्यालयात संपर्क साधावा किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.



