कल्याण-अहिल्यानगर मार्गावर सोमवारी सकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. या गाडीमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात खासगी बसेस , रिक्षा आणि अन्य वाहनांमधून बेकायदा आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असूनही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रवाशांची सुरक्षा मात्र धोक्यात सापडली आहे
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव फुटल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात विशेषकरून घोडबंदर रस्त्यावर धावणाऱ्या खासगी बसेसमधून गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या प्रवासी वाहतूक होत आहे. संपूर्ण दिवसभर ठाणे पूर्व ते कासारवडवली-ओव्हळा नंतर पुन्हा तेथून ठाणे पूर्व या मार्गावर या बसेस धावत असतात. टीएमटीच्या बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी बसमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी खासगी बसेस प्रवाशांनी हाऊसफुल्ल झालेल्या असतात. बसमध्ये अक्षरशः प्रवासी कोंबलेले असल्याचे दिसून येते.
या बसेस वेगात हाकल्या जात असून त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. या बसेसच्या मार्गावर वाहतूक शाखेचे आणि आरटीओचे कार्यालय आहे. तरीही बसेसवर कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्वचित केव्हातरी बसेसवर कारवाई करण्याचा देखावा प्रशासनाकडून केला जातो. परिणामी या अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम बसलेला नाही.
रिक्षांमधूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांत दिसत आहे. विशेषकरून शेअर रिक्षांमध्ये चालकाच्या दोन्ही बाजूला प्रवासी बसवले जात आहे. अशा रिक्षांमध्ये चालकाचे नियंत्रण सुटून जीवघेणा अपघात घडू शकतो. याचे गांभीर्य चालकांना नसून बिनदिक्क नियम पायदळी तुडवणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या एका रिक्षाचालकाला पकडण्याच्या प्रयत्नात रिक्षाचा धक्का बसून वाहतूक शाखेतील एक वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाले होते. या प्रकारानंतर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई थंडावल्यानंतर ‘परिस्थिती जैसे थे’ असते.



