कोकण आणि महामुंबई परिसरातील बहुतेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट असून अनेक भागात रविवारी चाळीशीपार तापमानाची नोंद झाली. साधारणत: आणखी आठवडाभर अधिक तापमान जाणवेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे. समुद्रकिनारपट्टीलगत असणाऱ्या भागात मात्र तुलनेने कमी तापमान आहे.
रविवारी महाड तालुक्यातील बिरवाडी येथे सर्वाधिक ४३.९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल शहापूरच्या भातसानगर येथे ४३.२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. कोकणातील समुद्रकिनारपट्टीच्या भागात मात्र तुलनेने आल्हाददायक परिस्थिती आहे. समुद्रकिनारपट्टीपासून पाच किलोमीटरच्या परिघात तापमानाचा पारा अद्याप चाळिशीच्या आत आहे. रविवारी वेंगुर्ला येथे ३३ अंश, मुंबईतील सांताक्रूझ आणि रत्नागिरीत कमाल ३४.५ तापमानाची नोंद झाली.
उच्चांकाची नोंद
घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात तापमानाने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. कोकणातील चिपळूणला ४३, कर्जत – ४२.२, महामुंबईच्या वेशीवरील नेरळला ४२.१ इतक्या तापमानाची नोंद रविवारी झाली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीतही अनुक्रमे ४१.४ आणि ४१.२ इतक्या तापमानाची नोंद झाली.



