म अल्टमन... वय वर्षे ४०... या तरुण उद्योजकाने ‘एआय’द्वारे संपूर्ण तंत्रज्ञानविश्वात खळबळ उडवून दिली आहे. आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे शब्द सर्वांच्या ओठी आहेत. अल्टमन या ‘एआय’ क्रांतीचा प्रणेता मानला जातो. ‘ ओपनएआय ’ या कंपनीचा सीईओ म्हणून काम करताना त्याने घडवलेल्या ‘ चॅटजीपीटी ’ या ॲपने तंत्रज्ञान क्षेत्रात थक्क करून टाकणारी क्रांती घडवून आणली आहे.
वयाच्या १९व्या वर्षी अल्टमनने २००५मध्ये ‘लूप्ट’ नावाचे मोबाइल-आधारित सोशल नेटवर्किंग ॲप मित्रांना शोधण्यासाठी तयार केले. या स्टार्टअपने त्याला ओळख मिळवून दिली. ‘लूप्ट’मध्ये मोठी गुंतवणूक झाली. सन २०१२मध्ये ते ४.३ कोटी डॉलरना विकले गेले. त्यानंतर तो सन २०११मध्ये ‘वाय कॉम्बिनेटर’ (वायसी) या जगप्रसिद्ध स्टार्टअप ॲक्सलरेटरमध्ये सहभागी झाला. सन २०१४मध्ये तो ‘वायसी’चा अध्यक्ष झाला.
सन २०१५मध्ये अल्टमनने एलन मस्क, ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केवर यांसारख्या तज्ज्ञांसोबत ‘ओपनएआय’ची स्थापना केली. हे एक ना-नफा संशोधन केंद्र म्हणून सुरू झाले होते. त्याचा मुख्य उद्देश मानवजातीला लाभदायक ठरेल अशा पद्धतीने कृत्रिम प्रज्ञेचा विकास करणे, हा होता. मस्कने नंतर कंपनी सोडली आणि अल्टमनने ‘ओपनएआय’चा सीईओ होऊन नेतृत्व केले. कंपनीने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आणि अब्जावधी डॉलरची गुंतवणूक मिळवली. सन २०२२मध्ये ‘चॅटजीपीटी’ आले आणि संपूर्ण जग बदलले. हे ‘एआय’ चॅटबॉट इतके लोकप्रिय झाले की, अवघ्या पाच दिवसांत त्याचे १० लाख ग्राहक झाले आणि जगभरात ‘एआय’ची लाट आली. ‘ओपनएआय’ आता अब्जावधी डॉलरची कंपनी झाली आहे. सन २०२६पर्यंत कंपनीचे मूल्य एक लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. पुढे कंपनीने ‘जीपीटी-फोर,’ ‘सोरा’ (व्हिडिओ जनरेशन) आणि इतर प्रगत मॉडेल विकसित केली. त्यांचा उपयोग शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, लेखन आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रांत होत आहे. अल्टमन ‘एआय’चे रूपांतर वीज किंवा पाण्यासारख्या मूलभूत सेवेत करण्याचे स्वप्न पाहात आहे.






