छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहातून उभारलेल्या ‘ऋणानुबंध’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी सायंकाळी पाचला गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात उद्योजकद्वय राम भोगले व उमेश दाशरथी यांचा सत्कार होणार आहे. भोगले यांना राजस्थान येथील पंडित दिनदयाल उपाध्याय शेखावाटी विद्यापीठ, सीकर यांच्याकडून ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही मानद पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांचे शिक्षण, आरोग्य व उद्योग क्षेत्रातील योगदान याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत आहे. दाशरथी यांना जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मॅनेजमेंटतर्फे जेआयपीएम टीपीएम एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. दोघेही ऋणानुबंधचे माजी अध्यक्ष आहेत.
पार्कचे उद्या लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : महापालिका व सीएसएन फर्स्ट यांच्या पुढाकारातून तसेच एआयटीची ग्रुपच्या सहकार्याने ज्योतीनगर येथील प्ले पार्कचे लोकार्पण रविवारी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होईल. आम्हाला खेळू द्या या महापालिकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. संकल्पनेची मांडणी सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष मुकुंद भोगले यांनी केले आहे. निसर्गाशी संवाद साधणारी, मुलांच्या मानसिकेतला पोषण आणि सर्वसमावेशक अशी खेळाची जागा विकसित केली आहे. सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा म्हणाले,की हा उपक्रम प्रशासन, उद्योग व नागरिक संस्था यांच्यातील समन्वयाचे प्रतीक आहे. प्ले पार्क प्रकल्प प्रथमच शहरात पीपीपी मॉडेलद्वारेे साकारला आहे.
एक ठार, दोन जखमी
जालना : जालना-मंठा रोडवरील चारचाकी-ट्रक अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. शंकर विठोबा सूर्यवंशी (वय ५९ रा. पूर्णा जि. परभणी) असे मृताचे नाव आहे. देविदास रामराव जोशी (वय ५५), रेणुकादास जोशी (वय ७५, रा. बोरी, ता. जिंतूर) जखमी झाले.






