छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणी पुरवठा योजनेचे येणारे संभाव्य अवाढव्य वीज बिल लक्षात घेऊन महापालिकेने सोलार प्रकल्प उभारणीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या संदर्भात येत्या दोन आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे. किमान शंभर मेगावॅटचा हा प्रकल्प असणार आहे. शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा येत्या दीड - दोन महिन्यात कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे, तर ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा जास्त क्षमत असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे वीजेचे बिल दरवर्षी शंभर ते सव्वाशे कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. वीज बिलाचा बोजा महापालिकेवरच पडणार आहे, त्यामुळे हा बोजा पडू नये म्हणून सोलार प्रकल्पाचा मार्ग निवडण्याचे पालिकेने ठरवलेआहे. या संदर्भात बोलताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले, सोलार प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात दोन आठवड्यात निर्णय घेतला जाईल.
शहराला सध्या उपलब्ध होत असलेल्या पाण्यामध्ये महिनाभरात पन्नास एमएलडी पाण्याची भर पडेल, त्यामुळे पाणी वितरणातील गॅप कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास महापालिकेचे आयक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केला.
शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची चाचणी १४ एप्रिल रोजी यशस्वी झाली. २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या माध्यमातून जायकवाडीहून नक्षत्रवाडी पर्यंत नाथसागराचे पाणी आणण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेच्या यंत्रणेला यश आहे. ३८ किलोमीटरचा प्रवास करुन पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुध्दीकरण केंद्रात आले. या वेळी पालिकेचे आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे उपस्थित होत्या.
नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आल्यावर या पुढचा टप्पा कसा असेल या बद्दल पत्रकारांशी बोलताना अमोल येडगे यांनी महिनाभरात नवीन पाणी पुरवठा योजनेतून किमान पन्नास एमएलडी पाणी शहरासाठी वाढून मिळेल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यक ती कामे पूर्ण करुन ते लवकर कार्यान्वीत करणे, वितरण वाहिन्यांमधील गॅप लवकर भरून काढणे ही कामे करावी लागणार आहेत. जलशुध्दीकरण केंद्राच्या ड्रेनेज लाईनसाठी २१ दिवस लागणार आहेत. याच काळात अन्य कामे करुन घेण्याची सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. ही कामे झाल्यावर सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यात किमान पन्नास एमएलडी पाण्याची वाढ होईल, त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करण्यास मदत होईल, यासाठी किमान एक महिना लागेल.






