भू-राजकीय तणाव निवळल्याने निर्माण झालेली सकारात्मकता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे शुक्रवारी शेअर बाजार उसळले. ‘ सेन्सेक्स ’ ५०४.८६ अंकांनी उसळून ७८,४९३.५४ वर स्थिरावला. ‘निफ्टी’ १५६.८० अंकांनी वधारून २४,३५३.५५ वर बंद झाला.
सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान ‘सेन्सेक्स’ ५६४.७७ अंकांनी वधारून ७८,५५३.४५पर्यंत पोहोचला. ‘सेन्सेक्स’मधील हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड, रिलायन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्र आणि टायटन यांचे समभाग वधारले. महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टूब्रो आणि एचसीएल टेक हे समभाग पिछाडीवर राहिले. बीएसई स्मॉलकॅप सिलेक्ट इंडेक्स १.७६ टक्के, मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स १.३१ टक्क्यांनी वाढला. एफएमसीजी (२.५७ टक्के), यंत्रसामग्री (२.१९ टक्के), पॉवर (१.९५ टक्के), युटिलिटीज (१.५१ टक्के), एनर्जी (१.४३ टक्के) आदी क्षेत्रीय निर्देशांकही वधारले.






