छत्रपती संभाजीनगर : सतरा वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या तरुण बॉक्सर्सनी शेवटच्या दिवशी दमदार कामगिरी केली. नागपूरला झालेल्या स्पर्धेत शहरातील ओवी अदवंत हिने महाराष्ट्राच्या मोहिमेचे नेतृत्व करत ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आणि ' बेस्ट बॉक्सर (मुली)' चा किताबही जिंकला. ती गीता गुरुकुल विद्या मंदिरात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
अंतिम फेरीत ओवीने एसएससीबीच्या नैतिकवर ४:१ अशा फरकाने मात केली. या विजयासह ओवीचे हे सलग तिसरे राष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. या यशानंतर तिची निवड पुढील महिन्यात ताश्कंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकणारी ओवी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राने मुलींच्या सांघिक गटात ४२ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर हरियाणाने ५१ गुणांसह विजेतेपद पटकावले. साईच्या संचालक मोनिका घुगे, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक राहुल टाक, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चव्हाण, सचिव रोहन टाक, गीता गुरुकुल विद्या मंदिरचे संचालक दत्ता गंडे यांनी ओवीचे कौतुक केले.





