तांब्याची तार चोरणारे गजांआड

महाराष्ट्र टाइम्स

वेदांतनगर पोलिसांनी बीएसएनएलच्या तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पकडले आहे. दोन आरोपींना अटक झाली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयासमोरील जालना रस्त्यालगतच्या डक्टमधून सुमारे २०० मीटर कॉपर केबल चोरीला गेली होती. या चोरीचा तपास सुरू असून मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

तांब्याची तार चोरणारे गजांआड
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बीएसएनएलची भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला वेदांतनगर पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संतोष विलास शिंदे ( वय २०), किरण उर्फ विशाल अशोक पवार (वय २३, दोघे रा. सईदा कॉलनी, हर्सूल) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत, तर अर्जुन शिंदे व विशाल शिंदे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, १७ एप्रिल रोजी पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेत जिल्हा सत्र न्यायालयासमोरील जालना रस्त्यालगत बीएसएनएलच्या डक्टमधील सुमारे २०० मीटर लांबीची कॉपर केबल चोरट्यांनी ओढून बाहेर काढून चोरी केली होती. या प्रकरणी बीएसएनएलचे उपमंडळ अभियंता सागर अशोक पारधे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास चक्र फिरवत याप्रकरणी संतोष शिंदे, किरण उर्फ विशाल पवार आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दोन साथीदारांच्या मदतीने केबल चोरी केल्याची कबुली संतोष व किरण या आरोपींनी चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून साडेतीन लाख रुपये किंमतीची कॉपर केबल तसेच चोरीसाठी वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा सुमारे ८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपास सुरू असून, केबल चोरीमागील आणखी मोठे रॅकेट आहे का, याचाही तपास केला जात आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. सुपे आणि त्यांच्या पथकाने केली.