कंपनीतील सर्व गुन्ह्यांबाबत नाशिक पोलिस आयुक्तालयाने दहशतवादविरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), राष्ट्रीय व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना माहिती दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू केली आहे; तर ‘एटीएस’ नाशिकच्या पथकाने या गुन्ह्यांत सध्या नाशिक पोलिसांच्या कोठडीत असलेल्या रझा आणि शफी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. संशयितांना बाहेरील काही संघटनांचे आर्थिक ‘फंडिंग’ होते का, यासह देश-विदेशात काही संबंध आहेत का, याचा तपास सुरू आहे.
बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवरील अत्याचार, विनयभंगासह धार्मिक भावना दुखावल्याच्या सर्व गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन सर्व आठ संशयित ांना बडतर्फ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून, त्याबाबत कारवाई सुरू झाल्याचे विश्वसनीय पोलिस सूत्रांनी सांगितले. संशयित रझा मेमन आणि शफी शेख पोलिस कोठडीत असताना ‘एटीएस’ने त्यांचा ताबा घेतला आहे. यासह पसार असलेली संशयित निदा खान तीन महिन्यांची गर्भवती असून, ‘एसआयटी’ने मुंब्रा येथे तिच्या पतीचा जबाब नोंदवला आहे.
कंपनीतील प्रकरणाबाबत देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ गुन्हे नोंद आहेत. संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी नाशिकरोड कारागृहात आहेत. संशयित निदा खान पसार असून, नाशिक आयुक्तालयाचे विशेष तपास पथक (एसआयटी) मुंब्र्यात तळ ठोकून आहे. निदा गर्भवती असल्याचे पुरावे वकिलांमार्फत पोलिसांकडे सादर झाले असून, तिला याआधी दीड वर्षाचे बाळ आहे. गंभीर गुन्ह्याबाबत तिला पोलिसांनी नोटीस बजावली असून, तिच्या पतीने मुंब्रा पोलिसांसमोर ‘एसआयटी’कडे जबाब नोंदवला आहे. गर्भवती असल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये निदाला अटकेपासून संरक्षण मिळण्याची चिन्हे आहेत.






