रायगंज/मालदा : ‘ भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या द्वेषमूलक विचारधारेने राज्यघटना उद्ध्वस्त केली आहे’, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे एका जाहीर सभेमध्ये केला. राहुल यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस वरही टीका केली. ‘तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात तृणमूल काँग्रेस अपयशी ठरली’, असे ते म्हणाले. ‘भाजप व संघाची विचारसरणी द्वेषाची आहे. या विचारसरणीने देशाची राज्यघटना उद्ध्वस्त केली. राज्यघटना पायदळी तुडवण्याची एकही संधी भाजप व संघ सोडत नाहीत’, असा आरोप राहुल यांनी केला. ‘प. बंगालमध्ये आमची सत्ता आल्यास मतदारयाद्यांतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची नावे पुन्हा समाविष्ट केली जातील’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
‘तृणमूल सर्वांत भ्रष्ट’
‘तृणमूल सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. नरेंद्र मोदी हे सर्वांत भ्रष्ट पंतप्रधान असतील तर तृणमूल काँग्रेसने त्यांचाही विक्रम मोडत त्याहून अधिक भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप करत शारदा, रोझ व्हॅली आदी फसव्या योजनांची उदाहरणे राहुल यांनी दिली.
‘प. बंगालमध्ये हत्या, बलात्कार, दंगली, राजकीय हिंसाचार आदी गुन्ह्यांचे प्रमाण टिपेला पोहोचले असून राज्यात भीतीचे वातावरण आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. ‘मात्र, त्याचवेळी बंगालमधील नागरिकांना भाजपप्रति असणारा उत्साह, ऊर्जा उल्लेखनीय आहे’, असेही ते म्हणाले.
प. बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या उपक्रमांतर्गत दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधला. ‘डाव्या पक्षाच्या अत्याचारी राजवटीतून सुटका व्हावी म्हणून बंगालमधील मतदारांनी तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली. परंतु ममता यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्याचार व दमनशाहीच्या बाबतीत आधीच्या सरकारलाही मागे टाकले. बंगालमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक जण अडचणीत आहे. हत्या, बलात्कार, दंगली, राजकीय हिंसाचार यांनी कळस गाठला आहे. तरुणांना रोजगाराची चिंता आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांवर तृणमूलच्या टोळ्यांची दहशत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्क मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हे सरकार प्रत्येक कामात कमिशन खात आहे’, अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली. ‘बंगालमधील सर्वसामान्य नागरिकांना घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या समस्येची चिंता भेडसावत आहे. या घुसखोरांमुळे राज्यात अनेक ठिकाणची लोकसंख्या रचना बदलली आहे. गेल्या काही दिवसांत मला बंगालमध्ये जाण्याची अनेकदा संधी मिळाली. यावेळी भाजपप्रति असणारा नागरिकांचा उत्साह दिसून आला. याचे श्रेय तुम्हां कार्यकर्त्यांना जाते. तुमच्यासारख्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. समाजाच्या सर्व स्तरांत तुम्ही घेत असलेले परिश्रम मी बघत आहे’, असेही त्यांनी नमूद केले. ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या मंत्राद्वारे तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचला आहात. तृणमूल सरकारची कृष्णकृत्ये सर्वसामान्यांपुढे उघड करण्यात तुम्ही यशस्वी झाले आहात. तुम्ही सर्वसामान्य महिलांशीही संपर्क साधा व त्यांच्या समस्या जाणून घ्या’, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.





