विदर्भाचे चार जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण

Contributed byम.टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अकोला ४४.२, अमरावती ४४, वर्धा ४३.९ तर नागपूर ४३.४ अंश सेल्सिअस

विदर्भाचे चार जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण

विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली असून हा प्रदेश देशातील हॉटस्पॉट झाला आहे. अकोला येथे बुधवारी ४४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्याखालोखाल अमरावती येथे ४४, वर्धा येथे ४३.९ आणि नागपुरात ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चवथ्या स्थानावर होती.

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पारा चांगलाच तापू लागला आहे. बुधवारी तर सकाळी ९ वाजतापासूनच शहरात उन्हाचा तडका जाणवू लागला होता. दुपारी १२च्या सुमारास शहरातील अनेक रस्त्यांवरील वर्दळ काहीशी कमी झाली होती. बुधवारी देशातील पहिल्या दहा उष्ण शहरांपैकी सात शहरे महाराष्ट्रातील होती. यात विदर्भाखेरीज सोलापूर ४३.३, मालेगाव ४३.२ आणि बीड येथे ४३.१ अंश तापमानाची नोंद झाली. ही तिन्ही शहरे अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर होती. याखेरीज विदर्भात भंडारा ४१, बुलढाणा ४२.४, चंद्रपूर ४२.६, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४२, वाशीम ४२.६ आणि यवतमाळ येथे ४२.८ अंश तापमान होते.