एप्रिल महिन्यातच पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागपूरकरांना येणाऱ्या काळात उष्णतेच्या तीव्र लाटेला तोंड द्यावे लागणार असल्याने त्यापासून बचावासाठी नागपूर महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महापालिकेने ‘हिट ॲक्शन प्लान’ची अंमलबजावणी करत नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत.
वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी महापालिकेने शहरातील मंदिर, हॉटेल्स, रेस्टारंट, मॉल्सनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे. तसेच, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात गरजू आणि बेघर नागरिकांना थंडावा मिळावा, यासाठी मॉल्समध्ये प्रवेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. मनपाने शहरातील आठ संवेदनशील ‘हॉटस्पॉट’ क्षेत्रे निश्चित केली आहेत. यामध्ये भांडेवाडी डम्पिंग यार्ड, कळमना एपीएमसी मार्केट, मोमिनपुरा, बोरियापुरा, इतवारी, कॉटन मार्केट आणि ताजबाग झोपडपट्टीचा समावेश आहे. ही क्षेत्रे निश्चित करताना या भागांमध्ये हरित क्षेत्राचा अभाव, दाट वस्ती आणि प्रदूषणामुळे उष्णता अधिक जाणवत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. हिट ॲक्शन प्लाननुसार उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी वाढवण्यात येणार आहे. नागपुरात सुमारे ४ हजार ५८७ किलोमीटर रस्त्यांपैकी २ हजार किलोमीटर अधिक रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. या रस्त्यांमुळे उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी फवारल्याने उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणे शक्य होणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्णता प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये शहरातील ११ रुग्णालयांमध्ये ‘कोल्ड वॉर्ड’ सुरू केले आहे. तसेच, १५० प्राथमिक आरोग्य केंद्रेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. उष्माघाताचे रुग्ण ओळखण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांना दुपारच्या वेळी सिग्नल ब्लिंकिंग मोडवर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर शाळांना दुपारच्या वेळेत कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बेघर नागरिकांसाठी सध्या सुमारे ४५० लोकांची निवास व्यवस्था असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या निवारा केंद्रांची उभारणी करण्याची तयारी सुरू आहे. वॉटर एटीएम, ग्रीन नेट, सोलर पॅनल आधारित शेड्सची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


